Tuesday, November 6, 2018

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी
                          
दिवाळी पर्वातील तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस नरक चतुर्दशी  या दिवसाला उत्तरेकडे रूप चौदस असे ही म्हटले जाते.महाराष्ट्रात हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून प्रसिद्ध आहे.
           
या दिवसाचे पौराणिक महत्त्व असे:
              
नरकासुर नावाचा उन्मत्त असुर प्राग्ज्योतिषपुर नावाच्या नगरावर राज्य करीत होता. जर कोणी आपल्या पत्नीला घेऊन त्याच्यावर चालून येईल  तोच नरकासुराचा वध करेल असा त्याला वर मिळाला होता. नरकासुर ज्या राज्यावर स्वारी करे तेथून विजय चिन्ह म्हणून स्त्रिया आणि मुली उचलून आणत असे .अशाप्रकारे त्याने सोळाहजार एकशे स्त्रिया -मुलींना  बंदी केले होते. आपल्या नगराच्या संरक्षणासाठी त्याने विद्युत तटबंदी केली होती.ही तटबंदी अभेद्य असल्याने नरकासुरावर कोणी प्रति हल्ला करण्याचा विचार प्रत्यक्षात आणत नव्हते. नरकासुराच्या दहशतीमुळे सर्वत्र हाहाःकार माजला होता.श्री कृष्णाने नरकासुराचे पारिपत्य करण्यासाठी  आपली लाडकी पत्नी सत्यभामा हिला घेवून प्राग्ज्योतिषपुरावर हल्ला केला. सुदर्शनला चक्राच्या सहाय्याने  विद्युत तटबंदी तोडून नरकासुराचे पारिपत्य केले.त्याने बंदी केलेल्या सोळाहजार एकशे बायकांना  मुक्त केले.या स्त्रिया समाजाकडून अवमानित होतील व स्वजन त्यांचा स्वीकार करणार नाहीत हे जाणून श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केला. त्याना सन्मानाने द्वारकेत स्थान दिले. श्रीकृष्ण विजयाच्या  आनंदात द्वारकापुरीत दिव्यांची रोषणाई केली गेली.त्याचे प्रतिक म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे दिव्यांची रोषणाई करण्याची पद्धत आहे.नरकासुराचे प्रतिक म्हणून उजव्या पायाच्या अंगठ्याने चिराट फोडण्याचा प्रघात आहे.चिराट फोडुन  परत दोन तांबे पाणी अंगावर घेतल जात.त्यानंतर. पुरुषांना श्रीकृष्ण स्वरूप समजून विजया प्रित्यर्थ अोलेते अंग असतानाच अौक्षण करतात.
         
नरक चतुर्दशीला ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान केलेल्याने नरक यातना भोगाव्या लागत नाहीत असे सांगितले जाते
          
पुराणा नुसार रन्तिदेव नावाचा अत्यंत सत्शील,दानी आणि सज्जन राजा होता.त्याची मृत्यु घटीका जवळ आल्यावर यमदूत त्याचे प्राणहरण करण्यासाठी आले.त्याना पाहून रन्तिदेवाला आश्चर्य वाटले.त्याने यमदूताना विचारले "मी विचारात देखील पाप आणले नाही सर्व आयुष्य लोककल्याणासाठीच वाहिले मग मला नेण्यास तुम्ही आलात म्हणजे नरक गती कशी मिळाली" तेव्हा "हे राजन तुझ्या नकळत एक माणूस तुझ्याद्वारा अन्नापासून वंचित राहिला  आहे" हे पाप नकळत घडले आहे त्यामुळे तुला नरक गती प्राप्त झाली "असे यमदूताने सांगितले.त्यावेळी राजाने पापक्षालनार्थ एक वर्षाचा अवधी त्यांच्या कडून मागून घेतला.त्याने वर्षभर अन्नछत्रे चालवून पापक्षालन केले त्या बरोबर नरकचतुर्दशीचे व्रत करून यमयातनांपासूनही मुक्ती मिळवली.
            
उत्तरेकडे या दिवसाला रूपचौदस असेही म्हटले जाते.
 
यादिवशी अभ्यंगस्नान केल्यास रुपसंपदा प्राप्त होते जशी हिरण्यगर्भ राजाला प्राप्त झाली.हिरण्यगर्भ राजा" राज्यान्ति नरक प्राप्ती होते" हे जाणून आपले राज्य योग्य हाती सोपवून तपश्चर्या  करण्यासाठी वनात गेला.काही दिवसातच त्याच्या  शरीरावर कीडे पडू लागले.त्याचे रूप भेसुर दिसू लागले. त्याने नारद मुनीना विचारले असता बसण्याच्या चुकीच्या आसनाचा परिणाम असल्याचे  नारद मुनीनी सांगितले या कुरूपतेवर उपाय म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी अंगाला तेल लावून पाण्यात कडूनिंबाचा पाला घालून त्याला सूर्योदयापूर्वी स्नान करण्यास सांगितले.तसे केल्याने त्याचे शरीर सुंदर आणि आरोग्यपूर्ण झाले.म्हणून अभ्यंगाचा प्रघात पडला.व रुप चतुर्दशी  हेही नाव रूढ झाले.

         ऋतुमानाचा विचार करता दिवाळीच्या दिवसात थंडीची सुरवात होते.  शीतकालात त्वचा रुक्ष होऊन तिच्यातील स्निग्धांश कमी झाल्याने  खरखरीत होते. तेल लावल्याने त्वचेला स्निग्धता मिळते आणि उटणे लावल्याने जास्त झालेला तेलाचा अंश निघून जातो त्या बरोबर त्वचेवरील कोरडा थर (डेड स्कीन)निघून गेल्याने शरीरावर तजेला येतो.तेल-उटणे अंगाला लावताना हलके अंगमर्दन होत असल्याने रुधिराभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते  नेहमी पेक्षा भुकही जास्त लागते याचा विचार करून अंघोळी नंतर फराळाची पद्धत सुरू झाली या  सगळ्या  फायद्यामुळे पहिल्या आंघोळीला महत्त्व मिळाले आहे.  भारतात सण- वार साजरे करताना माणसाचे आरोग्यही  जपले जाते.



   
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment