Wednesday, January 9, 2019

गर्दीतली माणसं

गर्दीतली माणस
                               
                   सकाळी सात चाळीसची  ठाणा लोकल म्हणजे विविध स्वभावांच्या माणसांच्या  एक बेट होत.त्यात येणा-या माणसांचे स्वभाव पारखण्याचं मला वेड लागल होत.अगदी  वस्तू  विकायला येणाऱ्या बायका,मुली,डब्यातून प्रवास करणाऱ्या बायका सगळ अगदी कस रंगी बेरंगी होत.हवहवस वाटणार.

               याच गाडीच्या लेडीज डब्यात मला ती भेटली.

भारतीय महिला असतात त्याच उंचीची,रंग काळा म्हणता येईल असा.पण मेकपच्या सहायानं तो सावळेपणाकडे झुकवला गेलेला.
दिसताना ती सुखवस्तू घरातली दिसायची.  रुपगर्विता म्हणता येणार नाही पण नाकीडोळी नीटस होती. उत्तम पगाराची नोकरी असावी असे अंगावरील कपड्यावरून वाटत होते. कोणी काही आणल,नवीन खरेदी केली असं सांगताच मलापण असचं हवं होत ग.पण आमच्या घरी म्हणजे अंधारच सगळा.

                एक दिवस ती जरा नाराजीनच अाली होती.काय झाल विचारताच.माझ्या भावजईनं जागा घेतली.तीन बेडरूमची.मला मात्र फक्त वन बेडरूमचे घेऊन दिली.हे तिच्या नाराजीचा कारण समजले होत.

   "अग तुम्ही दोघे मिळवते आहात घ्याल की तुम्ही ही एक सखी म्हणाली.
आमच्या घरी सगळाच अंधार आहे.अस म्हणून ती रुसका चेहरा करून बसली.हिच्याकडे राहायला घर,उत्तम नोकरी,सगळ असतानाही तिच्या चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले. धमाल समूहातला हा धमाल नमुना म्हणजे अगदी नजरेत भरण्या सारखा होता. काही विनोद झाला तरी ओठांची इस्त्रीची घडी किंचित हलेल पण नंतर परत अगदी चपखल बसेल इतकी कडक की ही घडी मोडली असेल अशी शंकाही येणार नाही.

                तिला बोलताना जीभ आडवी घालून बोलायची सवय होती. काही झाल की हे  आमच्या नशीबी कुठे? अस बोलून इतर वेळी बंद कडक इस्त्रीच्या तोंडाने बसणारी ती सासू,घर,मुलं,बचत हे विषय आले की एखाद्या धबधब्या सारखी बोलू लागे. विशेषकरून सासू आणि नणंदा हा तिच्या तक्ररींचा सुर असे. कोणी त्या विषयी चांगल बोललं तर ती  तोंडाचा चंबू करून अय् Sया अस एका  विशिष्ट लकबीत म्हणत असे ते बाकी इतक छान वाटे की या लकबीवर तिचा नवरा नक्की फिदा झाला असेल अस वाटून जाई.पण असे क्षण फारच कमी येत असावेत कारण ही कायम आपली रुसक्या गौरीसारखा लांब. चेहरा करूनच बसलेली असे.

              मनात येई ,असेल काही विवंचना सतत त्याचा विचार करीत असेल अस म्हणून दुर्लक्ष करीत सगळ्याजणी.

                 मे महिन्याचे दिवस होते.ब-याचजणी इकडे-तिकडे फिरायला गेल्या होत्या आमची धमाल समूहाची संख्या अर्ध्याने घटली होती.तरीही ज्या मुंबईत होतो त्या सात चाळीस गाठत होतो.

                 रोजचे विषय नव्हते बरेचदा विषय पर्सनल होत होते.तेवढ्यात कोणीतरी सासूबाई किती चांगल्या आणि नणंद किती मदत करते असा काहीतरी विषय सुरू झाला.

                  तिला काय झाल कोण जाणे तिच्या इस्त्रीची घडी मोडली सासू कशी वाईट ह्याचा पाढा वाचायला तिनं सुरवात केली.
अग!माझा मुलगा दहावीला आहे.त्यामुळे त्याच्यासाठी केबल वर्षभर बंद करायच ठरवल तर ती म्हातारी मला म्हणते "मी काय करायच दिवसभर" माझा मुलगा आहे. त्याला कमी मार्क मिळाले तर ही थेरडी काय करणार.अस काय डबोलं घेऊन आली आहे का? रहायला तर क्वार्टर्स् च आहेत.मी ,माझ्या माहेरच्यानी मदत केली म्हणून घरात चार गोष्टी दिसतायत.ती आणि तिच्या त्या मुली मला शिकवतात.आज मी आणि माझे आई-वडील,माझे भाऊ आहेत म्हणून हे अाहेत.मग माझ्या समोर गमजा कसल्या मारते. अग माझ्या भावांनी आणि वडिलांनी मदत केली म्हणून मी घर माझ्या पैशाने घेतल.तिला आणि तिच्या मुलाला स्वतःच छप्पर मिळाल.

                  मे महिन्यात जाते आपल्या लेकीकडे निघून तेव्हा माझी आई आणि वडीलच येतात मुलाकडे लक्ष द्यायला.तिला कळत नाही  माझ्या मुलाची शाळा सुरू होते.

               मुलगाही असा आहे तिचा की लवकर. जातच नाही आणायला.तिची मुलगी फोन करते अजून आठ दिवसानी येईल थेरडी.

                    मी आवाक् झाले होते.रागात असल तरी इतकं बेताल बोलणे,आणि सासूबाईंच्या विषयी थेरडी,म्हातारी अशी विशेषण ऐकून मला विचित्र वाटत होत.  सखी आपल्या आईचा राग आल्यावर अशीच बोलत असेल का?त्यात मी माझं माहेर,माझे भाऊ,माझे आई-वडील हे सतत ऐकून माणूस. विटून जाईल मग तिच्या सासूबाई काय करतील. सखीचा नवरा  हे नामुष्कीचं जीणं कस जगत असेल.
लोकव्यवहार आणि नामुष्की यांनी त्याच काय होत असेल.बर तिच्या सांगण्या नुसार रहायला क्वर्टर्स् आहेत म्हणजे तो एकतर सरकारी नोकरीत असावा किंवा एखाद्या उत्तम कंपनीत मग हिच्या बोलण्याने तो दुखावला जात नसेल का? त्याला त्याचा स्वभिमान नसेल का? कोणती आई आपल्या मुलाला बोललेल ऐकेल?कोण मुलगा निगरगट्ट होऊन हे सगळ सहन करेल?असे एक ना अनेक प्रश्न मनात येत होते.सगळ्यात महत्त्वाच म्हणजे मी एकच बाजू ऐकत होते या गोष्टीला दुसराही पैलू असेलच की. तो समोर येईल का?

                  कदाचित मुलीवरच्या अति प्रेमापोटी माहेरहून अतिढवळाढवळ होत नसेल कशावरून?  किंवा सखीच्या असमाधानी आणि स्पर्धाखोर स्वभावामुळे ती सतत माहेरी आपल्या संसारातील कमतरता बोलून दाखवत असली तर तिच्या आई-वडिलांना गिल्ट येऊन तर असे वागत असतील का? या प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नव्हती,आणि ती मिळण्याची शक्यताही नव्हती.तेव्हा अनुमानावरच काम चालवावी लागणार होत.

                   बहुतेक तिला कुटुंबाची महत्त्व आणि नाते संबंध राखायचे कसे हे कळलेलं नसणार.त्यात जर माझे माहेर, पगार,पैसा,असा मीपणा कोण सहन करील.

                तिला तिच्या म्हणण्या प्रमाणे घराने हलावे बोलावे,खावे,
प्यावे असे वाटत आहे.ते कसे पूर्ण होणार.पण काही बोलणे इष्ट नव्हते.

                  त्या दिवशी ती ट्रेनला चढली अगदी आनंदात होती. पर्स मधून तिनं पेढ्याचा बाॅक्स काढला माझा मुलगा पास झाला! पास झाला! अस सांगत ती पेढे वाटत होती.

                    एका थोरल्या सखीन तिला विचारल किती मार्क मिळाले.८५%तिन खालच्या आवाजात सांगितले. "अग घरादाराला वेठीला धरून इतकेच" मला वाटले ९९%मिळतील काय मिळवलस ग!सासूला वेठीला धरून आणि आता जा तुझ्या माहेरून ते सुधारता आलं तर बघ.नाहीतर सांग तुझ्या भावांना त्याला कमी मार्क मिळालेत ते थोडे वाढवून द्यायला.

                    अग आमच्या आॅफीसातला शिपाई आहे.त्याच्या मुलाला चाळीतल्या खोलीत राहून सतत असलेल्या गोंधळात अडचणीच्या एका खोलीत राहून ८६%मिळालेत.ते कौतुकास्पद आहेत की तुझ्या मुलाचे ?
तिचा पडलेला चेहरा मला दिसला,डोळ्यात जमा झालेले अश्रू ही दिसले पण ते पुसायला कोणीच पुढे होत नव्हत. तिच्या अहंपणाला औषध नव्हत. कारण तिच्या माहेर कडून तिला धक्का बसल्या शिवाय तिला आपली चूक समजणार नव्हती.

                     त्या दिवशी आईच्या सांगण्याचं महत्त्व पटलं.

कमीपणा आला तरी सासर धरून ठेवावं,नणंद,दीर,जावा आपल्या मानाव्या. तोंड जरा बेतानं सोडावं माहेर आयुष्याला पुरत नाही आणि मैत्रिणी आरसा असतात हे पुन्हा नव्याने पटल.

                आईला मनापासून नमस्कार केला.
तिनं आपल्या केवळ बोलण्यातून नाही तर कृतीतून मला हे दाखवलं होत.
                          
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषाप्रतिष्ठान

गर्दीतली माणसं

गर्दीतली माणसं
                         
                 माझ्या हातात पुस्तकांची भली मोठी बॅग होती,स्टेशनला पोहोचले तो ट्रेन लेट. काय कराव सूचत नव्हत.तेव्हा बाजूने जाणाऱ्या दोघीजणी ७.४०च्या ठाणा ट्रेनने डाऊन-अप करून जाणार अस बोलत गेल्या. महाजनो येन गतःस पन्थः म्हणून मी बॅगेच ओझ वहात त्यांच्यामागे गेले.

                 व्ही.टी.कडून ठाण्याकडे जाणाऱ्या रिकाम्या ट्रेन मधे मी बसले होते.ही ट्रेन परत ठाणा व्ही.टी. होत असे.मी प्रथमच असा प्रवास करीत होते.फार सुखावह वाटत होता हा प्रवास .

            याच गाडीत मला शैलूताई भेटल्या.अगदी शांत,सौम्य चेहरा पण एक प्रकारचा रुबाब त्यातून दिसत असे,बोलणे इतक लाघवी की त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला नकार देताच येत नसे.
           साधारण पाच सव्वापाच फूट उंची रंग गोरापान चेहरा,त्या चेहऱ्यावर. आत्मविश्वास,आणि,निश्चय मुक्कामाला आहेत हे जाणवे. काळानुसार रहाणीमान असल तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातल आई एलिमेंट लपत नव्हत. सौम्य रंगाची काॅरपोरेट लुकची साडी,गळ्यात साधारण मध्यम जाडीची चेन, कानात सोन्याचे फॅन्सी टाॅप्स् , हातात एसबेडाची बॅग असा साधा पण उच्चराहाणीमान दर्शवणारा पेहराव.केस व्यवस्थित यू कट करून पीन ने बांधलेले.असले तरी त्यांच्या चेहऱ्याला ते सुट होत होते. त्या मला सांगत होत्या.आमचा एक ग्रुप इकडे बसतो. आम्हाला एकत्र प्रवास करायचा असतो.तेव्हा तुम्ही दुसरी कडे बसाल का?मी उठून वर ठेवलेली बॅग काढयला लागले ते पाहून त्यांना काय वाटले कोण जाणे त्यांनी मला तिकडेच बसण्याची परवानगी दिली,आणि मला धमाल समूहाचे  सदस्यत्व मिळाले.

                मीही त्यांच्यात गुंतून गेले होते. मी आता रोजच डाऊन-अप करून जात होते.ओळख वाढत गेली माझी जुजबी माहिती या सगळ्या ग्रुपला  मिळाली.

                  त्या दिवशी शैलूताई उशीरा आल्या कारण दुस-या दिवशी त्यांचा पन्नासावा वाढदिवस होता.सगळ्या समूहाने त्यांना सरप्राईज द्यायचे ठरवले होते.मला पण जायचं होत पण अचानक सेमिनार लागल्याने मला जाता आल नाही.

                   त्याच दिवशी मी संध्याकाळी पाच वाजता सेमिनार संपवून. एशियाटीक च्या पाय-या उतरून खाली आले तो मागून तृप्ती तृप्ती अशा हाका ऐकू आल्या मागे शैलूताई उभ्या होत्या.
"अग इकडे काय करतेस!" त्यांनी विचारल.
"मी पी.एच.डी.करते आहे. सेमिनार होत.म्हणून आले होते" मी त्यांना सांगितले.
अग तुला वेळ आहे का?चल काॅफी घेऊ.
चला मला आज गिरगावातच जायचं आहे.अस म्हणून आम्ही दोघी हाॅटेलात गेलो.
इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्या.
तृप्ती मला तुझ बाळ गेल्याच कळलं खर आहे का ग?मी ग्रुपमधे ऐकल. होय मी म्हटले.अग किती बॅलन्सपणे सांगते आहेस.काहीच वाटत नाही का ग?वाटत ना शैलूताई पण रडत बसून काय होणार?माझ्यामुळे घरातली माणसं हवालदिल होतील.घराची घडी विस्कटेल त्रास तर होतोच पण अभ्यासाने सावरलेला मला.खर आहे ग!आयुष्यात एकदम येणार रिकामपण काय असत ते मी स्वतः अनुभवलय ग!

            तुला माहित आहे माझ लग्न झालेल नाही.अस म्हणण्यापेक्षा मीच ते केल नाही अस म्हणावे लागेल.

मला शिक्षणाची आवड होती.बाबांनी मला बी.ए.पर्यंत शिकवल. घरात आम्ही सहा माणसं आम्ही दोन बहिणी,दोन भाऊ आणि आई-बाबा बाबा सचिवालयात कारकून होते.आई घरातच असे.चार चार मुलांची शिक्षण खूप ओढाताण व्हायची आई-बाबांची    आमच्या शेजारी जोशी काका रहायचे एक दिवस ते म्हणाले शैले बी.ए. होऊन घरात काय बसतेस.माझ्या आॅफीसात व्हेकन्सी आहे.चल मी चिकटवतो तुला! मी ही हुरळून गेले.मला नोकरी मिळणार मी बाबांचा सपोर्ट होणार.अशी स्वप्न घेऊन कस्टमस् डिपार्टमेंट मधे लागले.

               खरच त्यानंतर बाबांचं ओझं डोक्यावरून खांद्यावर आल मी त्यांच्या बरोबरीने जबाबदारी वाटून घेऊ लागले.भावांची शिक्षणं व्यवस्थित चालू झाली.

                       आईनं माझ लग्न व्हावे म्हणून हालचाली सुरू केल्या.मला असा जोडीदार हवा होता जो माझी जबाबदारी वाटून घेईल पण या अपेक्षेमुळे सगळे मुसळ केरात गेले.कोणीही  माझी जबाबदारी वाटून घ्यायला तयार नव्हता.प्रत्येकाला बायको हवी होती पण तिची जबाबदारी नको होती.मी ही पर्वा केली नाही. एकाने तर चक्क सांगितले तुमच्या पगारातले पैसे द्या पण जबाबदारी नको.तर एक म्हणाला लग्न झाल्यावर तुम्ही आमच्या होणार म्हणजे तुमचा पैसाही आमचा पण वडिलांची जबाबदारी आमची नाही.

हे सगळ पाहून बाबांना चक्क सांगितले सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या की मग माझ्या लग्नाचा विचार करू.

              इकडे नोकरीत पगार मिळत गेला.माझी आई अचानक अजारी पडली.तेव्हा तिची शुश्रूषा,घरकाम,  नोकरी यात मी दंग होते.पण आई फार राहिलीच नाही.तेव्हा मी बाबांचा आधार झाले.बाबाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी माझ्यावर अवलंबून राहू लागले.तो पर्यंत मी वयाच्या चाळीशी जवळ आले होते.लहान बहीण लग्नाच्या योग्य झाली होती.भाऊ शिकून योग्य मार्गाला लागले होते.

              मीच पुढाकार घेऊन बहिणीच लग्न करून दिल.भावांची लग्न करून देताना माझ न झालेल लग्न नकाराची कारण होत होत.त्या वेळी जोशीकाकांनी सांगितल्या प्रमाणे मी ठाण्याला  जागा घेतली.आता माझी जबाबदारी भावांवर नाही.हे निश्चित झाल.त्यांची लग्न झाली त्या नंतर सगळ चित्रच बदलल.

                 ताई तू खूप केलस आमच.असं म्हणणारे भाऊ उपकार केले नाहीस अशी भाषा करू लागले.  ताई आमच्या संसारात डोकावता कशाला. अशी शेलकी वाक्य मला ऐकवली जायची.बाबा मात्र माझ्या मागे ठामपणे उभे होते.एक दिवस दोनही भावांना बोलावून बाबांनी दुसरी घरं बघा ही गिरगावातली जागा मी शैलूच्या नावाने केलीय हे सांगताच.मी काहीतरी मोठा गुन्हा केल्यासारखे वातावरण तयार झाल.मी कानकोंडी व्हायची त्यावेळी पण बाबांकडे बघून मी सहन करत गेले.बाबांनाही बदल जाणवत होता.ते मनातून खचले होते.

                  ते सतत म्हणत शैले मी तुझ नुकसान केलं ग!अशी निखातरी मूल मी जन्मालाच घातली नसती तर बर झाल असत.याच गोष्टीची टोचणी लागून त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.मी अगदी एकटी झाले होते.शेवटी जोशी काकाच मदतीला आले.त्यांनी गिरगावातली जागा भाड्यान दे आणि ठाण्याच्या जागेत राहायला जा असा सल्ला दिला.

               मी ठाण्याला आले माझ स्वतंत्र एकटीच आयुष्य सुरू झाल.सणवार,कार्यप्रसंगी मला वरवरच बोलावणं येऊ लागल.फक्त पैशाची अडचण आली की ताई आठवत होती. मी गिरगावातील घर भाड्याने दिले होते.ते भाडे  एक महिना एका भावाला तर दुस-या महिन्यात दुस-या भावाला देत होते.ते दोघेही हक्क असल्यासारखे ते घेऊन जात असत.  "काय करायचेत ताईंना पैसे आहे कोण खायला?आमचच आहे सगळ!" असे ऐकू येऊ लागले होते.मीही मनातून भावंडांपासून दूर जात होते.त्यांच्या माझ्यात मायेचे बंध अटले होते.मला एकदम रिकामपण आल होत.

            जोशी काका मला आधार देत पण तेही थकत चालले होते. मी प्रमोशन घेतल.काम वाढवल. पण अजून दहा वर्षानी मी काय करणार ग!आज मी पन्नास वर्षाची झाले. तुम्ही सगळ्यामुळे माझ वयाने मोठं होणे साजर केलतं.मी तुलाच शोधत होते.तू अशी भेटलीस बघ.

              मी सुन्न झाले होते.मी शैलूताईंना म्हटल शैलूताई उद्या हाफ डे घ्या.मी तुम्हाला दुपारी दोन वाजता भेटते. दुस-या दिवशी मी शैलूताईंना श्रद्धानंद महिलाश्रमात घेऊन गेले.मी तिकडे जाऊन महिलांना शिकवायला जात असे.शैलूताईंना येणारे विणकाम,भरतकाम त्या बायकांना शिकवाल का? असे मी म्हणताच त्यांचे डोळे वेगळ्याच आशेन चमकत होते.

               मला खूप दिवसानी शैलूताई आश्रमात भेटल्या पण पहिल्या शैलूताईं म्हणजे शांत,गंभीर,माफक हासणा-या.आताच्या शैलूताई उत्साहाचा खळखळता झरा होत्या.आता त्यांना दहा वर्षानंतरची चिंता नव्हती किंवा भाऊ आपल्याला विचारतील किंवा नाही याची विवंचना नव्हती.त्यांना त्यांच फुलपाखरी विश्व मिळाल होत.त्यात त्या रंगून गेल्या होत्या.

          मला त्यावेळी शैलूताई एखाद्या तपस्विनीने सारख्या दिसल्या.त्यांच्यातल्या आई एलिमेंटची परिपूर्ती झाल्यामुळे त्या खूप खूश वाटत होत्या. माझे डोळे पाणावले होते.मी पटकन तिकडून निघून गेले.

माझ्या पाठीवर शैलूताईंचा आश्वासक हात फिरला. त्या जणू म्हणत होत्या मी आहे की अशी डळमळतेस काय?चल पुढे जा!

- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान