Friday, November 2, 2018

गोवत्स द्वादशी

गोवत्स द्वादशी
                            
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी गोवत्सद्वादशी नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रात या दिवसापासून दिवाळी सणाचा आरंभ होतो.

                       यादिवशी गाय आणि गो-ह्याची म्हणजे गाय-वासराची पूजा करतात. संध्याकाळच्या वेळेला  तुळशीवृंदावना जवळ गाय-वासराची पंचोपचाराने पूजा केली जाते तिला पुरणाची पोळी खायला घालतात. करंजीचा नैवेद्य दाखवला जातो.

                      या दिवशी लेकुरवाळ्या बायका दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवासाची सांगता होते.

                    या दिवसाला गुरुद्वादशीही म्हटले जाते.तसेच नंदिनी व्रत असेही म्हणतात
समुद्रमंथनातून नंदिनी,शुभदा,सुरभी,सुशीला व बहुला या पाच कामधेनू प्राप्त झाल्या त्या जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, अगस्ति, आणि गौतम ऋषी यांच्याकडे लोककल्याणासाठी सोपवल्या.                                                                        
            पृथु राजाने नैसर्गिक आपत्तीकालात गोमातेचे पूजन केले आणि प्रजेला नवजीवन मिळाले या प्रित्यर्थ नंदिनी व्रत म्हणजे गोपूजन केले जाते.

           पौराणिक कथेनुसारसुवर्णपुर नावाच्या नगरात. देवदानी नावाचा राजा आपल्या सीता व गीता या दोन राण्यांसह रहात होता  सीताराणी जवळ एक म्हैस होती आणि गीता राणी जवळ गाय आणि वासरू होते.दोनही राण्या आपापल्या गाई म्हशी वर जिवापाड प्रेम करीत असत एकदा म्हशीने सीते जवळ गीता गाय-वासरा मुळे माझ्यावर स्नेह करीत नाही अशी तक्रार केली रागावून सीतेने गाईचे वासरू मारून टाकले आणि ते गव्हाच्या राशी खाली गाडले. 

            राजा जेवणासाठी बसला असताना त्याच्या पानात रक्त मांसाचा पाऊस पडला आकाशवाणी झाली "तुझ्या राणीने वासरू मारले,पाप केले गोरज मुहूर्तावर. गाय-वसराचे पूजन कर"पाप क्षालन होईल म्हशीला नगरा बाहेर हाकल त्या वेळे पासून गोवत्स पूजनाची परंपरा रूढ झाली. म्हणूनच या दिवशी गहू,मूग आणि कापलेली फळे न खाण्याची प्रथा आहे

                     यादिवसाला उत्तरेकडे बच्छबारस बारस म्हणजे द्वादशीला आणि बच्चा म्हणजे वासरू म्हणून बच्छबारस असेही म्हणतात. 

                 एका लोक कथेनुसार फार पूर्वी एक सावकार होता.  हंसराज आणि बच्छराज नावाचे त्याचे दोन नातू होते एकदा त्याच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली त्याने तलाव खोदला पण पाणी लागेना त्यामुळे सावकाराने आपली समस्या विद्वत्सभेसमोर ठेवली. तेव्हा आपल्या दोन नातवांपैकी एकाचे बलिरुपाने समर्पण केल्यास पाणी लागेल असे कोणीतरी सांगितले.लाखो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे सावकाराने मनाशी ठाम निश्चय. केला. त्याने आपल्या सूनेला हंसराजला बरोबर घेऊन माहेरी पाठवले आणि बच्छराजाला लोककल्याणार्थ समर्पित केले.तळ्याला पाणी लागले त्या आनंदात एका यज्ञाचे आयोजन केले ,पण मन खात असल्याने सुनेला तोंड दाखवायची लाज वाटत असल्याने तिला बोलावले नाही.ती यज्ञ्यात सहभगी होण्यासाठी स्वतःहून परत आली.

तो दिवस आश्विन कृष्ण द्वादशी होती.तिच्या सासूबाईंनी तिला दिवसभर उपवास करायला सांगितला संध्याकाळी गोरज मुहूर्तावर दोघीनी तळ्याच्या काठी जाऊन गाय -वसराची पूजा केली आणि लाडवांचा नैवेद्य दाखवला. सासूबाईनी  देवाची प्रार्थना केली आणि आपली लाज वाचवण्याचे  गा-हाणे घातले नंतर सूनेला सांगितले आता म्हण " हंसराज, बच्छराज आओ लड्डू  उठाओ" सुनेने  मनापासून हाक मारताच चिखलाने माखलेले हंसराज आणि बच्छराज. तळ्यातून बाहेर आले.

    दुसरी एका लोककथा अशी आहे एका गावात एक सासू आणि सून रहात होत्या. त्यांच्याकडे गेहूला आणि धनुला नावाची दोन वासरे होती. एक दिवस सासूने सूनेला सांगितले "मी शेतावर जात आहे. गेहू्ँ लाकर पकाना " कामातील व्यग्रतेमुळे सुनेने "गेहूला-धनुला पकाना" असे ऐकले व पटत नसतानाही त्याप्रमाणे केले सासूबाई आल्या त्यांनी वासरांची विचारपूस केली तेव्हा सुनेन स्वतःची लाज राख असे गा-हाणे घालताच दोनही वासरे पातेल्यातून जिवंत होऊन बाहेर पडली

           धर्म किंवा विज्ञान काहीही असले तरी आपल्या आपत्याचा अधिकार असलेले दूध गाय माणसांस काढू देते हे गायीचे थोरपण आहे. म्हणून आजच्या दिवशी  गाईच्या आणि वासराच्या त्यागाची कृतज्ञता म्हणून गाय  वासराचे पूजन करण्याची परंपरा आहे.
              
- तृप्ती लोणकर
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment