Tuesday, November 6, 2018

लक्ष्मीपूजन

लक्ष्मी पूजन
                 
अश्विन अमावास्येला लक्ष्मी चे पूजन करतात.खरे पहाता महा लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे पण तिचे स्वतःचे असे एक वेगळे स्थान आहे.महा विष्णू जगत् पालक देवता अाहे तर महालक्ष्मी ही समृद्धी,ची देवता आहे. सामान्य अर्थाने लक्ष्मी म्हणजे पैसा-अडका, सोने, चांदी, थोडक्यात ज्या गोष्टी श्रीमंती या स्वरूपात मोडतात त्या गोष्टींचा वाचक शब्द असे आपण मानतो. पण पुराणांमध्ये अष्टलक्ष्मीचा उल्लेख आढळतो म्हणून
१)आदी महालक्ष्मी
२) धन लक्ष्मी
३)धान्य लक्ष्मी
४)संतान लक्ष्मी
५)गज लक्ष्मी
६) वीर लक्ष्मी
७)विजय लक्ष्मी
८) विद्यालक्ष्मी

अशा प्रकारे जीवन समृद्ध करणारी देवता म्हणजे लक्ष्मी होय.

लक्ष्मी किंवा महालक्ष्मी चे रूप अत्यंत सुंदर तेजस्वी आहे. ती चतुर्भुज आहे. तिच्या मागच्या दोन हातात कमलपुष्पे आहेत तर डाव्या हातात धन कुंभ आहे.उजव्या हात आशीर्वादार्थ उचललेला आहे.ती कमळाचे बसलेली आहे.तिच्या अंगावर दागिने आहेत.बाजूला दोन हत्ती आपल्या सोंडेने चव-या ढाळत आहेत.

बरेचदा महाविष्णूंचे पाय चेपताना लक्ष्मीचे वर्णन करतात.

आश्विन. अमावास्या लक्ष्मी चा अवरतरण दिन आहे.समुद्र मंथनातून निघालेल्या चौदा रत्ना पैकी लक्ष्मी  हे एक रत्न आहे.समुद्र देवता तिचे पिता आहेत. ती स्वभावाने चंचल आहे असे सगळे म्हणत असतात.कवी तर तिच्या एका जागी न टिकण्याच्या स्वभावावर हल्ला करतात
         
असे म्हणतात लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र रहात नाहीत. एका कवीने हा प्रश्न थेट लक्ष्मीलाच विचारला  तिने फारच सुंदर उत्तर दिले आहे
कवी    हे कमले! तू अडाण्याला 
            धन देतेस. विद्वानांचा द्वेष
                का करतेस?
लक्ष्मी        अरे!मी नाही चंचल
                   आहे. नाही स्वैर
                     व्यवहार करणारी
                    नाही.अडाणी,मूर्ख
                     मला
                    आवडत ही नाहीत
                    पण विद्वान हे
                  विद्वत्तेचं मुळे मान्य
                  होतात मग माझ्या
                  शिवाय अडाण्याला
                माझ्या शिवाय गती
                नाही.
विनोदाचा भाग सोडल्यास हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कमी शिकलेले लोक मेहनतीने पैसा मिळवत असतात.असो लक्ष्मी देवीचे वाहन घुबड आहे.
         
अशी महालक्ष्मी एक तडफदार स्त्री अाहे ती जगत् कल्याणा साठी पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करते अंबाबाई होऊन दुष्ट संहारही करते.ती आपल्या पतीने केलेली प्रतारणा सहन करीत नही.
           
करवीरलक्ष्मीची कथा अशी आहे. महाविष्णूने पद्मावतीशी विवाह करताच ती कोल्हासुराचा वध करण्यासाठी कोल्हापुरात आली असता तिकडून परत जात नाही. सूर्यदेवाकरवी  परत येण्या बाबतचा  महाविष्णूचा निरोप ती शांतपणे ऐकून उलट निरोपात जगत् कल्याणासाठी जगाच्या अंता पर्यंत करवीरात निवास करणार असे ठाम पणे सांगते.आणि पद्मावतीचा निरादर न करता तिरूपतीहून आणलेली मानाची साडी स्वीकार करून भक्ताची यात्रा सफल करते.
            लक्ष्मी पूजन करताना लक्ष्मी-गणेशाचे पूजन केले जाते.वास्तविक महालक्ष्मी बरोबर महाविष्णूंची पूजा करतात, महालक्ष्मी ही गणेशाच्या आई सारखी आहे.त्यासाठी एक मनोरंजक कथा आहे.

        पूर्वी एक साधूमहाराज लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करीत होते. साधूमहाराजांनी सर्वसंग परित्याग करूनही लक्ष्मीची उपासना करणे सुरू ठेवले.तपश्चर्याचे फल म्हणून. महालक्ष्मी प्रसन्न होऊन इच्छितफलप्राप्तिरस्तु असा वर त्या साधू महाराजांना मिळाला. त्यानुसार त्या प्रदेशाच्या राजाने त्यांना दरबारात मंत्रिपद दिले.साधू महाराजांना आपल्या पदाचा गर्व झाला. त्यांनी ताजमहाल पाडून नवीन महाल बांधण्याची आज्ञा केली.राजाने नाराजीनेच हो म्हटले महालात एक गणेशमूर्ती होती.त्या मूर्तीचे ध्यान आवडले नाही म्हणून त्याने ती मूर्ती काढून टाकण्याचे आदेश दिले.त्या आदेशाने विघ्नहर्त्या गजाननाचा अपमान झाला  गजाननाची अवकृपा झाली.राजाची मर्जी उतरल्याने त्याने साधूमहाराजांना बंदी बनवले आणि कारागृहात डांबले.
                     तेथे साधू महाराजांनी परत लक्ष्मीदेवीला प्रसन्न करायचा प्रयत्न सूरू केला.देवीने त्यांना दृष्टांत दिला तुम्ही गणेशाचा अपमान केला आहे त्याला प्रसन्न करून घ्या साधूने गणेशाची आराधना करून गणेशाला प्रसन्न करविले. त्या दिवसापासून लक्ष्मीपूजनाचे दिवशी लक्ष्मी-गणेशाचे पूजन केले जाते.

             खरेतर लक्ष्मी घरी आल्यावर माणसाची बुद्धी भ्रष्ट होण्याची शक्यता असते. मकाराची बाधा होऊ नये म्हणून बुद्धीची देवता श्री गणेशाचे पूजन करून बुद्धी मकार बाधित होऊ नये म्हणून प्रार्थना करायची असते.
                    
ही सुंदर, वैभवशाली, शक्तिशाली महालक्ष्मी आजही घराघरातून गृहलक्ष्मीच्या रुपाने निवास करते आहे.
लक्ष्मीचा निवास या ठिकाणी असतो असे सिद्धिलक्ष्मी स्तोत्रात सांगितले आहे.
      या श्री पद्मवने कदंब शिखरे
       राजगृहे कुंजरे श्वेतेचाश्वयुते
        वृषेचयुगले यज्ञेच युपस्थिते
         शंखे देवकुले नरेंद्र भवने
         गंगातटे गोकुले साश्री
          तिष्ठतु सर्वदा मम गृहे
           भूयात्  सदा निश्चला         
            
अर्थात जी लक्ष्मी कमळवनात,कदंबाच्या झाडाच्य. टोकावर,राजपरिवारात, हत्तीच्या ठिकाणी पांढ-या घोड्या च्या ठिकाणी,बैलजोडीच्या ठीकाणी,यागीय स्तंभाच्याठिकाणी, शंखात,देवळात,राजाच्या घरात,गंगा किनारी,गाईच्या गोठ्यात, निवास करते ती माझ्या घरात स्थिर राहो.
आजच्या रात्री धर्माने जुगार खेळण्यास परवानगी दिली आहे.


   
लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

नरक चतुर्दशी

नरक चतुर्दशी
                          
दिवाळी पर्वातील तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस नरक चतुर्दशी  या दिवसाला उत्तरेकडे रूप चौदस असे ही म्हटले जाते.महाराष्ट्रात हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून प्रसिद्ध आहे.
           
या दिवसाचे पौराणिक महत्त्व असे:
              
नरकासुर नावाचा उन्मत्त असुर प्राग्ज्योतिषपुर नावाच्या नगरावर राज्य करीत होता. जर कोणी आपल्या पत्नीला घेऊन त्याच्यावर चालून येईल  तोच नरकासुराचा वध करेल असा त्याला वर मिळाला होता. नरकासुर ज्या राज्यावर स्वारी करे तेथून विजय चिन्ह म्हणून स्त्रिया आणि मुली उचलून आणत असे .अशाप्रकारे त्याने सोळाहजार एकशे स्त्रिया -मुलींना  बंदी केले होते. आपल्या नगराच्या संरक्षणासाठी त्याने विद्युत तटबंदी केली होती.ही तटबंदी अभेद्य असल्याने नरकासुरावर कोणी प्रति हल्ला करण्याचा विचार प्रत्यक्षात आणत नव्हते. नरकासुराच्या दहशतीमुळे सर्वत्र हाहाःकार माजला होता.श्री कृष्णाने नरकासुराचे पारिपत्य करण्यासाठी  आपली लाडकी पत्नी सत्यभामा हिला घेवून प्राग्ज्योतिषपुरावर हल्ला केला. सुदर्शनला चक्राच्या सहाय्याने  विद्युत तटबंदी तोडून नरकासुराचे पारिपत्य केले.त्याने बंदी केलेल्या सोळाहजार एकशे बायकांना  मुक्त केले.या स्त्रिया समाजाकडून अवमानित होतील व स्वजन त्यांचा स्वीकार करणार नाहीत हे जाणून श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केला. त्याना सन्मानाने द्वारकेत स्थान दिले. श्रीकृष्ण विजयाच्या  आनंदात द्वारकापुरीत दिव्यांची रोषणाई केली गेली.त्याचे प्रतिक म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे दिव्यांची रोषणाई करण्याची पद्धत आहे.नरकासुराचे प्रतिक म्हणून उजव्या पायाच्या अंगठ्याने चिराट फोडण्याचा प्रघात आहे.चिराट फोडुन  परत दोन तांबे पाणी अंगावर घेतल जात.त्यानंतर. पुरुषांना श्रीकृष्ण स्वरूप समजून विजया प्रित्यर्थ अोलेते अंग असतानाच अौक्षण करतात.
         
नरक चतुर्दशीला ब्रह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान केलेल्याने नरक यातना भोगाव्या लागत नाहीत असे सांगितले जाते
          
पुराणा नुसार रन्तिदेव नावाचा अत्यंत सत्शील,दानी आणि सज्जन राजा होता.त्याची मृत्यु घटीका जवळ आल्यावर यमदूत त्याचे प्राणहरण करण्यासाठी आले.त्याना पाहून रन्तिदेवाला आश्चर्य वाटले.त्याने यमदूताना विचारले "मी विचारात देखील पाप आणले नाही सर्व आयुष्य लोककल्याणासाठीच वाहिले मग मला नेण्यास तुम्ही आलात म्हणजे नरक गती कशी मिळाली" तेव्हा "हे राजन तुझ्या नकळत एक माणूस तुझ्याद्वारा अन्नापासून वंचित राहिला  आहे" हे पाप नकळत घडले आहे त्यामुळे तुला नरक गती प्राप्त झाली "असे यमदूताने सांगितले.त्यावेळी राजाने पापक्षालनार्थ एक वर्षाचा अवधी त्यांच्या कडून मागून घेतला.त्याने वर्षभर अन्नछत्रे चालवून पापक्षालन केले त्या बरोबर नरकचतुर्दशीचे व्रत करून यमयातनांपासूनही मुक्ती मिळवली.
            
उत्तरेकडे या दिवसाला रूपचौदस असेही म्हटले जाते.
 
यादिवशी अभ्यंगस्नान केल्यास रुपसंपदा प्राप्त होते जशी हिरण्यगर्भ राजाला प्राप्त झाली.हिरण्यगर्भ राजा" राज्यान्ति नरक प्राप्ती होते" हे जाणून आपले राज्य योग्य हाती सोपवून तपश्चर्या  करण्यासाठी वनात गेला.काही दिवसातच त्याच्या  शरीरावर कीडे पडू लागले.त्याचे रूप भेसुर दिसू लागले. त्याने नारद मुनीना विचारले असता बसण्याच्या चुकीच्या आसनाचा परिणाम असल्याचे  नारद मुनीनी सांगितले या कुरूपतेवर उपाय म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी अंगाला तेल लावून पाण्यात कडूनिंबाचा पाला घालून त्याला सूर्योदयापूर्वी स्नान करण्यास सांगितले.तसे केल्याने त्याचे शरीर सुंदर आणि आरोग्यपूर्ण झाले.म्हणून अभ्यंगाचा प्रघात पडला.व रुप चतुर्दशी  हेही नाव रूढ झाले.

         ऋतुमानाचा विचार करता दिवाळीच्या दिवसात थंडीची सुरवात होते.  शीतकालात त्वचा रुक्ष होऊन तिच्यातील स्निग्धांश कमी झाल्याने  खरखरीत होते. तेल लावल्याने त्वचेला स्निग्धता मिळते आणि उटणे लावल्याने जास्त झालेला तेलाचा अंश निघून जातो त्या बरोबर त्वचेवरील कोरडा थर (डेड स्कीन)निघून गेल्याने शरीरावर तजेला येतो.तेल-उटणे अंगाला लावताना हलके अंगमर्दन होत असल्याने रुधिराभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते  नेहमी पेक्षा भुकही जास्त लागते याचा विचार करून अंघोळी नंतर फराळाची पद्धत सुरू झाली या  सगळ्या  फायद्यामुळे पहिल्या आंघोळीला महत्त्व मिळाले आहे.  भारतात सण- वार साजरे करताना माणसाचे आरोग्यही  जपले जाते.



   
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Sunday, November 4, 2018

धनत्रयोदशी

धन त्रयोदशी/धन तेरस

दीपावली सणाचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी .या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.या दिवशी धन्वंतरी,देवी धनलक्ष्मी,कुबेर आणि यमधर्म यांचे पूजन करतात.

             समुद्र मंथनातून द्वादशीला कामधेनु,त्रयोदशीला भगवान धन्वंतरी,आणि आमावास्येला महालक्ष्मी अवतरीत झाले त्यामुळे धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरी होते.

धन्वंतरी देवांचे वैद्य होते.ते हातात अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले.त्यामुळे या दिवशी सर्वाना आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना करतात. प्रसाद म्हणून कडूनिंबाची पाने व खडीसाखर दिली जाते.

         पौराणिक कथेनुसार भगवान महाविष्णु एकदा पृथ्वी परिक्रमा करण्यासाठी निघाले असता देवी लक्ष्मी त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट करू लागल्या.विष्णूनी ते सांगतील त्याप्रमाणे लक्ष्मी देवीने वागावे या अटीवर त्यांना बरोबर नेले.काही काळ दोघे बरोबर विचरण करीत होते त्यानंतर विष्णूने लक्ष्मीदेवीना एका स्थानी थांबून "मी दक्षिणेस कडे जातो तुम्ही या ठीकाणी थांबा "असे सांगून महाविष्णू दक्षिण दिशेला निघून गेले. देवी लक्ष्मीना राहवेना म्हणून त्याही रहस्य जाणून घेण्यासाठी महाविष्णूंच्या मागे गेल्या  जात असताना वाटेत त्याना सुंदर मोहरीचे शेत दिसले ते फुलांनी  भरलेले होते.ते पाहून त्या फुलांनी श्रृंगार करण्याची महालक्ष्मीला इच्छा झाली. तिने श्रृंगार केला आणि पुढे निघाल्या वाटेत त्याना ऊसाचे शेत दिसले देवी ऊस खाण्यासाठी शेतात उतरल्या ऊस घेतला त्या खात असतानाच महाविष्णू तेथे आले.  गरीब शेतक-याचा ऊस न विचारता घेतला म्हणून देवींवर संतप्त झाले.त्याना शाप दिला बारा वर्ष या शेतक-याच्या घरात राहून त्याची सेवा करा असे सांगून महाविष्णू निघून गेले.

                  लक्ष्मी देवी सेवाव्रत स्वीकारून तेथेच राहिल्या तो शेतकरी गरीब होता लक्ष्मीदेवीनी त्याच्या पत्नीला स्वतःची एक मूर्ती  दिली त्याचे पूजन करण्यास सांगितले.चमत्कार झाला. शेतक-याचे घर धन-धान्याने भरून गेले.अशी बारा वर्ष कधी सरली ते कळलेच नाही.  लक्ष्मी देवींची पेरण्याची वेळ झाली तेव्हा शेतक-याला सत्य ज्ञात झाले.तो देवीना जाऊ देईना तेव्हा लक्ष्मी देवीनी त्याला सांगितले उद्या आश्विन कृष्ण त्रयोदशी  आहे तू कलशात नाणी भरून पूजन कर मी कायम तुझ्या घरी वास्तव्य करीन.असे सांगून त्या स्वधामाला गेल्या.त्या वेळे पासून धनलक्ष्मीचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली.

           या दिवशी यमाला दीपा दान करण्याचाही प्रघात आहे. त्या मागे असलेल्या पौराणिक लोक कथेप्रमाणे एका राजाचा मुलगा होता. तो जन्माला येताच ज्योतिषाने  भविष्यवाणी केली याचे लग्न होताच चौथ्या दिवशी त्याला मृत्यू येईल त्या राजाने आपल्या मित्र राजा हेम याला सांगितले असता हेमराजाने त्या मुलाचे संरक्षण करीन असे सांगितले.हेमराजाने एक भूमीगत किल्ला निर्माण करून राजपुत्राची राहण्याची,विद्येची सोय केली मुलगा लग्नायोग्य झाला त्यावेळी त्याने एका सुंदर कन्येला पाहिले तिच्यावर मोहित होऊन तिच्याशी गंधर्व विवाह केला.

               मुलीला राजपुत्राच्या अपमृत्यू विषयी कळले तेव्हा चौथ्या दिवशी तिने राजपुत्राला एका खोलीत बसवले आणि दरवाजा बंद करून दरवाज्या पुढे दागिने,सोने,चांदी, यांचा ढीग लावला ती स्वतः दरवाज्यात. बसून राहिली यमदूत सर्प रूपाने  आला पण ढीग पार करण्यात यशस्वी झाला नाही त्यामुळे राजपुत्राचे प्राण वाचले.त्याची कृतज्ञता म्हणून तिने यमासाठी दीपदान केले.

           कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ गंधमादन पर्वतावरच्या १/४संपत्तीचा मालक हा देवतांचा द्रव्य रक्षक आहे. तो शिव मित्र आहे त्यामुळे आजच्यादिवशी त्याचे पूजन करतात धन,धान्य,आरोग्य प्राप्ती आणि अपमृत्यू भय निवारक अशी ही धन तेरस.

               सुगीचे दिवस असल्याने नवीन खरेदी विक्री याच दिवशी केली जाते.विशेष रूपाने सोने,चांदी आणि नवीन भांड्यांची खरेदी या दिवशी करतात.धर्माने घरातल्या  कच-याला ही लक्ष्मी मानले आहे त्यामुळे आजच्या दिवशी घरातील कचरा काढून झाल्यावर त्याला हळद-कुंकू वाहून मग कुंडीत टाकण्याची पद्धत आहे.
या दिवशी व्यापारी वर्ग नवीन चोपड्या खरेदी करतात थोडक्यात धनतेरस म्हणजे सर्व मान्य खरेदी दिवस आहे.

अशी ही धनतेरस केवळ सण नाही तर पर्व आहे
                       
-तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Saturday, November 3, 2018

रांगोळी

रांगोळी
                
       भारतीय परंपरेत रांगोळी या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. वाङमयातून. सडा,संम्मार्जन रांगोळी हा प्रकार रोजच्या जीवनातील. अविभाज्य भाग असल्याचे सांगितले आहे. संस्कृतमध्ये ‘रंगवल्ली’ अशी संज्ञा आढळते.      वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांच्या यादीत रांगोळीचा उल्लेख आहे. प्राचीन मराठी वाङ्‌मयातही रांगोळीचे अनेक ठिकाणी निर्देश आलेले आहेत. नलचंपूमध्ये (इ. स. दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचा उल्लेख आहे. गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे. मानसोल्लासात (बारावे शतक) सोमेश्वराने धुलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.

                 रांगोळी संपूर्ण भारतात शुभसूचक चित्र समजले जाते.ज्या घराच्या अंगणात रांगोळी नाही त्या घरात काहीतरी दुःखद घटना घडली आहे. किंवा त्या घरात गृहीणीचा वावर नाही असे समजतात.

मुख्यतः रांगोळीचे दोन प्रकार पडतात.
                 १) वल्लरी प्रधान
                  २)आकार प्रधान रांगोळी

               वल्लरी प्रधान रांगोळी महाराष्ट्रात प्रामुख्याने जेवणाच्या पंगतीची शोभा असते.त्यातील. नक्षीचे प्रवाहीपण अचूकसाधून सुशोभनासाठी केले जाते.त्या बरोबर काही विशेष व्यक्तींच्या ताटाभोवती काढलेल्या रांगोळीत. पाने-फुले वेल बुट्टी गोल यांचा सढळ वापर केला जातो.

           तर आकृतीप्रधान रांगोळीने महाराष्ट्रात दरवाजा बाहेरील अंगण सुशोभित केले जाते. काही वेळा काढल्या गेलेल्या बाह्य रेषांना कणा असे म्हणतात.नंतर त्या आकारांत रंगसंगती  साधून. ती आकृती सुशोभित केली जाते.

            अशाप्रकारच्या रांगोळ्या बहुतांश कोलम म्हणजे ठिपक्यांनी काढलेल्या असतात.यात काही वेळा अक्षरलेखन ही करतात. सुस्वागतम् हा शब्द हटकून दिसतोच.म्हणूनच अशा रांगोळ्या सणावाराला काढल्या जातात.

               काही वेळा कुलाचार किंवा कुलधर्माच्या वेळी ठराविक रांगोळ्या काढायची पद्धत आहे.महाराष्ट्रात. कोकणस्थ ब्राह्मणात बोडणाची रांगोळी तसेच देशस्थ ब्राह्मणात गव्हाचा चौक भरणे हे या विशिष्ट प्रकारात मोडते. नावाच्या वेळी देखील सीमा रेषा म्हणून ठराविक रांगोळ्या काढल्या जातात. तांत्रिकात देखील रांगोळी काढली जाते पण तिचा उपयोग सुशोभनासाठी  करीत नाहीत. त्याला रिंगण असे म्हटले जाते.बहुतांश सर्व प्रांतात रांगोळी काढण्याचा प्रघात भारतात आहे.

            भारतातील सर्व प्रांतात रांगोळी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. राजस्थानात ‘मांडणा' ‘सौराष्ट्रात’ ‘सथ्या’, मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशात‘चौकपूरना’ किंवा ‘सोनारख्नाआंध्रप्रदेशात ‘मुग्गू’, बिहारमध्ये ‘अरिपण’ अथवा ‘अयपन’,तमिळनाडूमध्ये ‘कोलम’, केरळात ‘पुविडल’, ओरिसात ‘झुंटी’, बंगालमध्ये ‘अलिपना’ आणि गुजरातमध्ये ‘साथिया’, कर्नाटकात   ‘रंगोली’ व महाराष्ट्रात ‘रांगोळी’ या नावांनी ओळखली जाते.
रांगोळी मुख्यतः स्त्रियाच काढतात.

               रांगोळी साधारणपणे दोन हजार वर्षांपासून काढली जाते.शिरगोळ्याचे चूर्ण किंवा भाताच्या तूसाची वस्त्रगाळ पूड करून त्या पासून ठिपके,त्रिकोण,चौकोन,गोल अशा भौमितिक आकारातून काही सांकेतिक चिन्हांच्या सहाय्याने ज्या रंगरेखा काढल्या जातात त्यामुळे घराचे दार,अंगण सुंदर दिसरतेच पण किडा,मुंगी,बारीक बारीक कीटक त्या परिसरात फिरकत नाहीत. हल्ली तांदुळाच्या पिठात फेविकाॅल. घालून कायम स्वरूपी रांगोळी रेखतात.

                    रोजच्या रांगोळ्यांमधून गोपद्म,कमळ,श्रीपादुका,कासव,चंद्र, सूर्य,बिल्वपत्र, शंख चक्र,स्वस्तिक इ.  चिन्हांनी आंगण सुशोभित केले जाई.हे आकार रंगीत करण्यासाठी,हळद,कुंकू गुलाल यात थोडी रांगोळी घालून योग्य रंगसंगतीने सुशोभित केले जात असत.

                आधुनिक काळात रांगोळीचे प्रकार बदलत गेले. केवळ बाह्य रेषा काढून त्या मधे वेगवेगळे रंग भरता येवू लागले आहेत. ठिपक्यांच्या सहाय्याने पोखरण, कमळ, बदके, राजहंस आदी चित्रे काढून त्यात अनेक रंगांच्या छटांनी ते रंगवले जात आहे.

                  साधारण दोन दशकांपासून संस्कारभारतीची रांगोळी हा प्रकार प्रचलित झाला आहे.पार्श्वभूमीला एखादा गडद रंग घेवून त्यावर दुस-या रंगाने वेलबुट्टी भौमितिक आकार काढून त्याची बाॅर्डर पांढऱ्या रांगोळीने उठावदार करून सण समारंभात रंगत आणली जाते.

                पेशवाईत जेव्हा जेवणाच्या पंगती बसत असत तेव्हा पानाभोवती रांगोळी काढण्याची प्रथा होती.यात. कलेची श्रीमंती दाखवणे,पंगतीला बसणा-या माणसाचे मन प्रसन्न करणे आणिअन्नाची सुरक्षा हे हेतू असत.

                     सणावाराची रांगोळी ही वेगळी असे.दिवाळीत लक्ष्मी पूजनाला सारीपाटाचा पट काढला जाई.चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी चैत्रांगण काढतात,अगदी संकष्टी चतुर्थीच्या दिवशीही  चंद्र दर्शन घेता न अाल्यास. रांगोळीने पाटावर चंद्र काढून व्रताचे उद्यापन करतात(उपवास सोडतात).

               मंगळाचा गौरीच्या पूजेला चौरंगावर भोवती महिरप काढून पुढे चौक भरला जातो. हल्ली तर पाने, फुले फुलाच्या पाकळ्या, पाने बारीक चिरून त्यांच्या सहाय्याने रांगोळ्या काढल्या जातात.

              रांगोळी किंवा रंगवल्ली आरेखन ही चौसष्ट कलांमधील एक कला आहे.कालानुरूप तिचे प्रकार बदलेले अाहेत हल्ली पोर्टेट रांगोळी हा प्रकार माणसाना आवडू लागला आहे.

               शहरात जागेची कमतरता असल्याने पुठ्ठ्याचे,ओ.एच्.पी.शीट.कचकड्याचे आकार कापून कुंदन, मोती, खडे यांनी सजवलेल्या पोर्टेबल रांगोळ्यांच्या स्वरूपात त्या दिसत आहेत.

              पारंपारिक रांगोळीचे स्वरूप जरी बदलले असले तरी रांगोळीचा हेतू शुभसूचक. चित्र हाच आहे. हजारो वर्ष बायकांनी पिढी दर पिढी जतन केलेली कला अजूनही माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
                  




-  तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Friday, November 2, 2018

गोवत्स द्वादशी

गोवत्स द्वादशी
                            
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी गोवत्सद्वादशी नावाने ओळखली जाते. महाराष्ट्रात या दिवसापासून दिवाळी सणाचा आरंभ होतो.

                       यादिवशी गाय आणि गो-ह्याची म्हणजे गाय-वासराची पूजा करतात. संध्याकाळच्या वेळेला  तुळशीवृंदावना जवळ गाय-वासराची पंचोपचाराने पूजा केली जाते तिला पुरणाची पोळी खायला घालतात. करंजीचा नैवेद्य दाखवला जातो.

                      या दिवशी लेकुरवाळ्या बायका दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवासाची सांगता होते.

                    या दिवसाला गुरुद्वादशीही म्हटले जाते.तसेच नंदिनी व्रत असेही म्हणतात
समुद्रमंथनातून नंदिनी,शुभदा,सुरभी,सुशीला व बहुला या पाच कामधेनू प्राप्त झाल्या त्या जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, अगस्ति, आणि गौतम ऋषी यांच्याकडे लोककल्याणासाठी सोपवल्या.                                                                        
            पृथु राजाने नैसर्गिक आपत्तीकालात गोमातेचे पूजन केले आणि प्रजेला नवजीवन मिळाले या प्रित्यर्थ नंदिनी व्रत म्हणजे गोपूजन केले जाते.

           पौराणिक कथेनुसारसुवर्णपुर नावाच्या नगरात. देवदानी नावाचा राजा आपल्या सीता व गीता या दोन राण्यांसह रहात होता  सीताराणी जवळ एक म्हैस होती आणि गीता राणी जवळ गाय आणि वासरू होते.दोनही राण्या आपापल्या गाई म्हशी वर जिवापाड प्रेम करीत असत एकदा म्हशीने सीते जवळ गीता गाय-वासरा मुळे माझ्यावर स्नेह करीत नाही अशी तक्रार केली रागावून सीतेने गाईचे वासरू मारून टाकले आणि ते गव्हाच्या राशी खाली गाडले. 

            राजा जेवणासाठी बसला असताना त्याच्या पानात रक्त मांसाचा पाऊस पडला आकाशवाणी झाली "तुझ्या राणीने वासरू मारले,पाप केले गोरज मुहूर्तावर. गाय-वसराचे पूजन कर"पाप क्षालन होईल म्हशीला नगरा बाहेर हाकल त्या वेळे पासून गोवत्स पूजनाची परंपरा रूढ झाली. म्हणूनच या दिवशी गहू,मूग आणि कापलेली फळे न खाण्याची प्रथा आहे

                     यादिवसाला उत्तरेकडे बच्छबारस बारस म्हणजे द्वादशीला आणि बच्चा म्हणजे वासरू म्हणून बच्छबारस असेही म्हणतात. 

                 एका लोक कथेनुसार फार पूर्वी एक सावकार होता.  हंसराज आणि बच्छराज नावाचे त्याचे दोन नातू होते एकदा त्याच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली त्याने तलाव खोदला पण पाणी लागेना त्यामुळे सावकाराने आपली समस्या विद्वत्सभेसमोर ठेवली. तेव्हा आपल्या दोन नातवांपैकी एकाचे बलिरुपाने समर्पण केल्यास पाणी लागेल असे कोणीतरी सांगितले.लाखो लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्यामुळे सावकाराने मनाशी ठाम निश्चय. केला. त्याने आपल्या सूनेला हंसराजला बरोबर घेऊन माहेरी पाठवले आणि बच्छराजाला लोककल्याणार्थ समर्पित केले.तळ्याला पाणी लागले त्या आनंदात एका यज्ञाचे आयोजन केले ,पण मन खात असल्याने सुनेला तोंड दाखवायची लाज वाटत असल्याने तिला बोलावले नाही.ती यज्ञ्यात सहभगी होण्यासाठी स्वतःहून परत आली.

तो दिवस आश्विन कृष्ण द्वादशी होती.तिच्या सासूबाईंनी तिला दिवसभर उपवास करायला सांगितला संध्याकाळी गोरज मुहूर्तावर दोघीनी तळ्याच्या काठी जाऊन गाय -वसराची पूजा केली आणि लाडवांचा नैवेद्य दाखवला. सासूबाईनी  देवाची प्रार्थना केली आणि आपली लाज वाचवण्याचे  गा-हाणे घातले नंतर सूनेला सांगितले आता म्हण " हंसराज, बच्छराज आओ लड्डू  उठाओ" सुनेने  मनापासून हाक मारताच चिखलाने माखलेले हंसराज आणि बच्छराज. तळ्यातून बाहेर आले.

    दुसरी एका लोककथा अशी आहे एका गावात एक सासू आणि सून रहात होत्या. त्यांच्याकडे गेहूला आणि धनुला नावाची दोन वासरे होती. एक दिवस सासूने सूनेला सांगितले "मी शेतावर जात आहे. गेहू्ँ लाकर पकाना " कामातील व्यग्रतेमुळे सुनेने "गेहूला-धनुला पकाना" असे ऐकले व पटत नसतानाही त्याप्रमाणे केले सासूबाई आल्या त्यांनी वासरांची विचारपूस केली तेव्हा सुनेन स्वतःची लाज राख असे गा-हाणे घालताच दोनही वासरे पातेल्यातून जिवंत होऊन बाहेर पडली

           धर्म किंवा विज्ञान काहीही असले तरी आपल्या आपत्याचा अधिकार असलेले दूध गाय माणसांस काढू देते हे गायीचे थोरपण आहे. म्हणून आजच्या दिवशी  गाईच्या आणि वासराच्या त्यागाची कृतज्ञता म्हणून गाय  वासराचे पूजन करण्याची परंपरा आहे.
              
- तृप्ती लोणकर
ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान