Tuesday, September 18, 2018

संवाद

संवाद
                         
सम्यक वचनेन परस्परं वदति सःसंवादः अशी जरी संवादाची व्याख्या केली तरी संवाद हा दोन व्यक्तीमधील बोलणे येवढ्यापुरताच मर्यादित नसतो. तर जेव्हा वैचारिक पातळीवर दोन व्यक्ती एकमेकांसमोर येतात त्या वेळेस त्यांच्यात जे सामंजस्य निर्माण होते.तो खरा संवाद.
                
मग परस्परांशी होणारे बोलणे म्हणजे काय? कित्येक वेळा बोलणे ही क्रिया जरी दोघांत होत असली तरी ती एकतर्फी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.दुसरे विचार ऐकून न घेता मत बनवणं म्हणजेच एकतर्फी असलेला संवाद असे म्हणावे लागेल.त्यातून संवादाची प्रक्रीया सुरू न होता विसंवाद,वितंडाची प्रक्रिया सुरू होते.
            
मग असा प्रश्न पडतो संवादाची प्रक्रिया सुरू केव्हा होते?ती कोणाशी सुरू होते?
            
संवाद हा आध्यात्मिक असतो.होय अध्यात्मिक म्हणजे आधी(प्रथम) आत्मिक(स्वतःशी) म्हणजेच सर्व प्रथम संवाद स्वतःशीच सुरू होतो.
                 
स्वतः करीत असलेली कृती इतरांच्या नजरेत कशी असेल? त्याने कोणी नाराज होतील,दुखावले जातील का? किंवा माझे विचार जे मी बोलू इच्छित आहे हे  माझ्यामधील निराशा, अतिउत्साही, किंवा अतिरिक्त दुःखाचा अथवा सुखाच, आत्मप्रौढीच प्रदर्शन तर ठरणार नाहीत ना?

दुःख/सुख प्रदर्शन करताना किंवा  त्याबद्दल बोलताना ऐकणारा कंटाळणार नाहीना?या गोष्टीचा नीट विचार करून प्रदर्शित केलेले विचार संवाद या प्रक्रीये पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करताना दिसतात.
          
चाटूकारीता हा देखील एक संवादाचा प्रकार आहे म्हणतात ना प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः. अगदी योग्य अवतरण आहे.पण प्रिय म्हणजे केवळ. श्रोत्याला आवडेल असे बोलणे नव्हे.थोडक्यात सांगायचं त् चाटूकारिता म्हणजे हाँजी हाँजी करणे.यातून संवाद साधला जातच नाही तर असलेल्या विचारांचे  गर्व मिजास,माज अशा संकल्पनांमध्ये परिपाक. होत असतो.
                  
संवादाच्या प्रक्रियेत अविचार,भिडस्तपणा हे दोन शत्रू उभे असतात. विवेक न करता अविवेकाने बरळणे हा एक संवाद प्रक्रियेतील मोठा अडसर असतो.दुस-या शब्दात सांगायचे तर. हा काय बोलणार,सवतःला काय ढुढ्ढाचार्य समजतो किंवा समजते ,आम्हाला शिकवतो काय? असे म्हणत जेव्हा मुद्दे खोडण्यासाठी अविवेकीपणाने आणि आक्रमकतेने मुद्दे मांडणे.होत असते. म्हणजे वादासाठी वाद. करण्यासाठी  बोलणे होते या ठिकाणी संवादापेक्षा मान-अपमान-सन्मान,आदर,अनादर  अशा संकल्पना डोके वर काढतात.आणि संवाद तर होतच नाही पण वितंडा ही पराकोटीचा होऊन समाजात शोभा मात्र होते.
            
अविचारा प्रमाणे मी हे बोलू की नको त्याने माझ्यावर आक्रमक हल्ला केला तर? किंवा माझे बोलणे ऐकलेच नाही,अपमान केला तर? नकोच ते बोलणे असा भिडस्तपणाही संवादाच्या प्रक्रियेत घातक असतो.त्यामुळे कित्येकदा समाज विचाराधीन संकल्पनेच्या एखाद्या नव्या पैलूला मुकतो.
          
थोडक्यात काय तर समतोल विचार, आत्मसन्मान आणि परापमान याचे भान आणि सुसूत्र विचारसरणी,आणि आकर्षक मांडणी,विवेकीपणा  हे संवादाचे पैलू ध्यानात घेऊन जे बोलणे होते तोच संवाद किंवा सुसंवाद ठरतो.
                 
अशा संवाद प्रक्रियेची समाजाला आणि प्रसारमाध्यमांना गरज आहे.
                      
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Friday, September 14, 2018

जेष्ठागौरी

जेष्ठागौरी
   
सन्मान अदायादा कन्यांचा
                            
विवाहित स्त्री कितीही मोठी झाली तरी तिची माहेरची ओढ काही कमी होत नाही.कदाचित हेच ओळखून परंपरेने जेष्ठा गौरी हे भाद्रपदातील लौकिक व्रताची सुरवात केली असावी.
               
कहाण्यांतून वृद्धबाईला दरिद्री ब्राह्मण घरी आणतो.तिला तृप्त करण्या इतकी साधनसामग्री त्याच्याकडे आपोआप येते.तिसऱ्या दिवशी ती वृद्धावस्थेत आपण जेष्ठा गौर असल्याचे सांगून स्वस्थानीं निघून जाते.ती स्त्री नदी जवळ भेटली म्हणून नदीच्या काठचे पाचखडे घरी आणण्याची प्रथा आहे.
              
प्रांतानुरूप गौरींचे स्वरूप बदलते असते.म्हणूनच हे व्रत लौकिक म्हणजे लोकाचारातून निर्माण झाले अाहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गौरी बसवण्यासाठी ,पूजा,हवन असे शास्त्रोक्त विधी नाहीत अगदी साधेपणाने गौरी बसल्या जातात.
             
काही ठीकाणी विहिरी पाणवठ्या वरून पाच खडे किंवा तेरडा,अंबा आशा पाच झाडांचा फुलोरा आणण्याची प्रथा आहे या गोष्टी आणताना कुमारिका किंवा लहान मुलींचे आधिक संख्येने असतात.
          
त्या फुलो-या वर मुखवटा बसवून गौर उभी केली जाते. तर काही ठीकाणी पितळी मुखवटे संपूर्ण घरभर फिरवून धन्याच्या राशी अगर धातूच्या कोठ्यांवर ते मुखवटे बसवले जातात. तेरड्याच्या  किंवा फुलो-याची गौरी  एकच असते. तर धतूच्या मुखवट्याच्या दोन गौरी असतात.
         
खरे पाहता गौरी म्हणजे पार्वती.ही हिमालयाची कन्या पण सांबसदाशिवाशी  विवाह झाल्यामुळे माहेराला दुरावली होती.त्यामुळे तीन दिवस मानाने माहेरवाशीणीस बोलावण्याची प्रथा तिला गौरी आगमन,पूजन आणि विसर्जन(बोळवण) म्हणत असावे.
         
संख्येने दोन असलेल्या गौरीना महालक्ष्म्या असे म्हटले जाते.त्यातील जेष्ठ अलक्ष्मी आणि कनिष्ठ महालक्ष्मी असे म्हणतात.
               
गौरींचे मुखवटे  ताम्हणात ठेऊन घरात काढलेल्या पावलांचा मागोवा घेत थाळी,घंटा वाजवत वाजत गाजत गौरीना घरभर फिरवले जाते.जणू माहेरवाशीण आपल माहेरचे घर डोळेभरून पहात असते.आपल्या नाचण्या-बागडण्याच्या दिवसातील जागोजागी असलेल्या आठवणीना उजळून अगदी लख्ख करून मग ती हुश्श म्हणत आपल्या जागी विराजमान होते.
          
वास्तविक पहाता दक्षाने सतीदेवींचा अपमान केल्यापासून विवाहितेला आपल्या माहेरी देखील विचार करूनच जावे लागते.त्यातून. माहेरची सत्ता हाती असलेल्या भावजया ह्या त्या घरातील गृहलक्ष्म्या असतात.त्यामुळे माहेर जरी आपले म्हटले तरी तिकडे सत्ता मात्र गृहलक्ष्मीची असते.त्यामुळे मनातल्या मनात धुमसणा-या या  माहेरवाशीणी अलक्ष्म्यांचे प्रतीक म्हणून जेष्ठा असावी.तिच्या रागा लोभासहित तिला स्वीकारून. मानाने तिचा पाहुणचार करून तिला  माहेरचे सुख देवून तिला शांत,हसतमुख करून महालक्ष्मी रुपात पहाणे  ह्या हेतूने प्रतिक म्हणून महालक्ष्म्यांची स्थापना होते.
             
दुसरे असे धर्माने मुलीला अदायादा म्हणजे स्थावर-जंगमातील कसलाही  वारसा न मिळणारी अशी ठरवली आहे. त्यामुळे आई वडिलांकडून किंवा भावा कडून विवाहोत्तर. मानसन्मान. मिळणे जरा दुरापास्तच याकारणाने कदाचित आईच्या पश्चात तिला माहेरपणाच्या सुखाला मुकावे लागेल याचा खोलवर विचार करून फक्त तीन दिवस मुलीला माहेरपणाला बोलवावे जेणे करून नाते संबंधात फूट पडणार नाही.आणि   आपल्याला आईवडीलांनी दूर लोटले ही भावनाही मनात घर करून राहणार नाही.आईच्या पश्चात जर भावजयीशी नाही जमले तर निदान तीन दिवसासाठी तरी तिला भावाची बहिण झाल्याचे समाधान देण्यासाठी ही प्रथा सुरू झाली असावी.
           
गौरी पूजनाच्या दिवशी तिला मानाने जेऊ-खाऊ घालून साडीचोळी केली जाते. या तीन दिवसा खेरीज माहेरवशीणीस माहेरी येणे दुरापस्तच असते.भाऊबीजेला भाऊ तिच्या घरी जातो.म्हणूनच जेष्ठा गौरीच्या निमित्ताने  अलक्ष्मी सारखा तिच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाचा ज्वालामुखी बाहेर काढून टाकून ती कनिष्ठांच्या गौरी सारखी शांत,सौम्य,परोपकारी होऊन सासरी जाईल असा साधा उद्देश असावा.
              
भाद्रपद महिन्यात शेतीची कामेही फारशी नसतात त्यामुळे मुलीला तीन दिवस माहेरी धाडण्यास सासरहूनही खळखळ होणार नाही.तसेच सगळा राग,संताप,असंतोष मागे टाकून शरीराने आणि मनाने शांत आणि स्वस्थ झालेली स्त्री आपल्या घरची महालक्ष्मी होऊन जाईल.त्याच प्रमाणे मिळालेल्या मान सन्माच्या वागणूकीने सुखावलेली ती आई,वडील,भाऊ-भावजयी यांच्यावर नाराज राहणार नाही. जेणे करून नाते संबंध दृढ होतील.आणि आईवडीलांनी आपल्याला दूर लोटले हा ही समज दूर होईल.
             
म्हणूनच गौर आणताना गौराई आली सोन्याच्या पावली असे म्हणण्याचा प्रघात असावा.
            
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Wednesday, September 12, 2018

हरितालिका

हरितालिका

व्रत स्त्रीच्या दुर्दम्य दृढनिश्चयाचे

भाद्रपद शुद्ध तृतीयेला समस्त स्त्रीवर्ग हरितालिका व्रत करीत असतो.या व्रताच्या कहाणीतही व्रतात व्रत हरितालिका व्रत असे म्हणतात.काय आहे हे व्रत.पार्वती मातेने  सांबसदाशिव शंकरच आपला पती व्हावा या उद्देशाने केलेली शिव आराधना असे या व्रताचे स्वरूप आहे.
                
या व्रताची कथा पाहता आपल्या पित्याने निवडलेल्या श्रीमंत पतीची राणी न होण्यासाठी स्वतःला आणि शरिराला कष्ट देववून आपल्या इच्छितासाठी अपार कष्ट सोसण्याची ही कथा आहे. 
               
वास्तविक पहाता पार्वती माता आपल्या मातापित्याचे शेंडेफळ त्यामुळे लाडाकोडात वाढणे अपेक्षितच होते.पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट अति असेल तरी वाईटच बहुतेक तसेच पार्वतीदेवींचे झाले होते.सतत छानछोकीत रहाणे, श्रीमंती थाटात वागणे,बोलणे या पुढे शिवाचे साधे रहाणे,साधा आहार-विहार याचे आकर्षण वाटणे सहाजिकच होते. मग मनाने ते रहाणीमान आवडते आहे.आणि पिता आपल्याला परत श्रीमंती वातावरणात ढकलणार. असे कळताच.ते नाकारण्यासाठी पळून जाणे.
                
हे पळून जाणे स्वतः पार्वतीमातेला अशक्य होते म्हणून तिच्या सख्यांनी तिला पळवून नेले म्हणूनच या व्रताचे अभिधान हरिता आलिका हरिता म्हणजे पळवलेली तर आलिका म्हणजे मैत्रिणी  म्हणूनच. आजच्या दिवसाला आपण शिवा बरोबर सखी पार्वतीचे पूजन करतो.
               
खरे पाहता हे व्रत इच्छित वरप्राप्ती साठी कुमारिका करतात.तर पतीच्या आयुरारोग्यासाठी सवाष्णी करतात.पण हे व्रत तर स्त्रीच्या दुर्दम्य निश्चय शक्तीचे  धादांत उदाहरण म्हणावयास हवे.एखाद्या गोष्टीचा स्त्रीने घेतलेला ध्यास पूर्ण करण्यासाठी स्त्री किती पराकोटीचा सकारात्मक प्रयत्न करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हरितालिका हे व्रत आहे.तसेच केवळ मानमरातब,पैसाअडका,या बेड्यांत अडकून पडता स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने घडवण्यासाठी समर्थ असलेली पार्वतीमाता.आपल्या निश्चयाने सकल ब्रह्मांडाला सक्रिय करते.तिच्या आणि शिवाच्या विवाहासाठी सप्तर्षी,ब्रह्मदेव,अगदी ज्याच्याशी पित्याने विवाहाचा घाट घातला होता त्या महा विष्णूना देखील मध्यस्थी करावयास भागपाडण्याचे सामर्थ्य तिच्या निश्चयात सामावलेले आहे.
                   
हा विवाह आपणास सुखकर होईल किंवा नाही याची सुतराम शंकाही तिच्या मनात नाही.तर जगापासून अलिप्त असलेल्या महादेवांच्या मनी अनुराग उत्पन्न करण्यापासून ते कैलासावर वास्तव्यापर्यंत येणाऱ्या अनेक अडचणी सहज लांघून जात ती शिवाशी अद्वैत साधण्यात यशस्वी होते. इतके कठीण आणि आमूलाग्र होणारे बदल सहन करण हे केवळ निशचयाच्याच बळावर शक्य होत. म्हणूनच डोळसपणाने आणि सारासार विवेकाने केलेले निश्चय जगातही क्रांती घडवतात हे दाखवून देण आणि दृढनिश्चय या गुणाची महती सांगण्यासाठी या व्रताची योजना झाली असावी.
               
केवळ निश्चय असून काही भागत नाही.तर त्याला समाजाची स्नेही-सोबत्यांचीही जोड लागते.तिच जोड पार्वतीमातेच्या सखीन तिला दिली. तिन नुसती सोबत केली नाही तर तिच्या बरोबर ती तो प्रत्येक क्षण जगली.तेही कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता. अगदी निष्कामपणे तिन पार्वतीमातेच्या ईप्सिताच्या साधने मध्ये तिची संगत सोबत केली.या ऋणातून उतराई होण्यासाठी सखीपार्वतीच पूजन करतात.
               
या दिवशी निराहार राहत असतात.तर अग्निच्या संपर्कात आलेल्या पदार्थाला ऐवजी फलाहार करणे अपेक्षित असत.वैद्यकशास्त्रानुसार पहाता श्रावणातील व्रत वैकल्याने पोटाची लागलेली वाट आणि पचनशक्तीवर पडलेला अतिरिक्तताण दूरकरून डिटाॅक्सिफीकेशनचाच हा प्रकार आहे.या दिवशी  निर्जलोपवास करून रुईचे पानावर मधचाटून उपवास सोडण्याची पद्धत आहे. असे व्रत करण्यासही निश्चय लागतोच तर शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरिरस्थ उष्णता बाहेर टाकता येते.असा ऋतुमानानुसार आहार या व्रताचे वैशिष्ट्य आहे.
        
अशाप्रकारे हे व्रत म्हणजे हरप्रिया हरितालिका म्हणजेच स्त्रीशक्तीच्या दुर्दम्य दृढनिश्चयाच व्रत तुम्हा आम्हा समस्त स्त्रीवर्गाला सुफळ संपूर्ण होवो.
              
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

Thursday, September 6, 2018

शिक्षक आणि गुरु

शिक्षक आणि गुरु

साधारण पाचवी सहावीत असतानाची गोष्ट आहे. शेजारच्या आजींबरोबर काळ्यारामाच्या देवळात कीर्तन ऐकायला गेले होते. ह.भ.प.आफळे बुवांचे कीर्तन होते.काय संदर्भ आला तो आठवत नाही पण त्यांनी अहो आम्ही साधे शिक्षक आम्ही अध्यत्माची गोडी लावणार! तुम्हाला गुरूत्व पहायचे असेल तर गोराराम मंदिरात जा  ह.भ.प.रामदत्तबुवा देशपांडे यांच कीर्तन ऐका.

त्यावेळी काहीच कळत नव्हत पुढे इतकच कळायला लागल की गुरु आणि शिक्षक हे दोनही समानार्थी शब्द आहेत. पण ह.भ.प. आफळेबुवांचे वाक्य काही पिच्छा सोडत नव्हते. वाटायचं अस का बोलले बर ते?
              
आता जेव्हा विचार करते तेव्हा त्यातल तथ्य कळत आहे. खरच शिक्षक आणि गुरू यात महदन्तर आहे.
शिक्षक शब्दामधे एकप्रकारचा जिव्हाळा,प्रेम,माया या बरोबरच अनुशासन आहे.अल्लड वयात समाजाभिमुख करण्याची ताकद केवळ शिक्षकाचीच असते.

सर्वसामान्य अर्थाने पहाता  शिक्ष् शिकविणे,शिस्त लावणे,शासन करणे असे एक ना अनेक अर्थ घेऊन हा शब्द येतो.आणि म्हणूनच प्रथमिक स्तरावरचे आध्ययन म्हणजे शिक्षण असते. यात व्यवहारापासून ते वागणुकीत पर्यंत बोलावे कसे,उठावे,कसे,कधी कसे खावे, खाताना पानात अन्न विखरू नये, तोंडाचा मचमच असा आवाज करू नये अशा  अनेक बारीकसारीक गोष्टी एकत्रित असतात. याचे  मायेने शिक्षण देणारे असे शिक्षक असतात. 
         
शिक्षक ह्या शब्दाची व्याप्ती पहाता आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. आयुष्यात काय करावे ह्याची जाणीव करवून देण हे शिक्षकांच काम असते.तेही अगदी आईच्या मायेने विद्यार्थी घडवण हे शिक्षक करतो.अगदी केलेल्या कागदाच्या होडीच मनापासून कौतुक करण्या पासून ते आज मला आईन मारल माझी आई वाईट आहे.असे निरागस बोल ऐकून त्याचं समाधान मिळण्याची एकमेव  जागा म्हणजे शिक्षक.तर तू चुकलास तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळणारच ते  आज दोन दिवस तुझ्या डब्यात चकली वेफर्स असे का आहे.आई घरी नाही का?अस म्हणत स्वतःच्या डब्यातली पोळी-भाजी  खायला घालण्याच आईच कर्तव्य करणारा शिक्षक असे म्हणता येत म्हणजेच
        
अायुष्याला वळण लागण्याच्या वेळी जो आपली संगत सोबत करतो.जगाच्या दृष्टीने पोरकट ठरणार-या शंकांची सोप्या पद्धतीने उत्तरे देऊन व्यक्तिमत्व सकारत्मकते कडे वळवताना.साम,दाम,दंड,भेद प्रकारांचा उपयोग करून ओबडधोबड दगडाचा त्याच्या नकळत चिरा करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय.
            
मग गुरु म्हणजे काय?गुरू म्हणजे वडिलांची त्रयस्थ वृत्ती नियमीततेची  शिस्त आणि सोळाव्या वर्षी मिळणाऱ्या वडिलांच्या मित्रत्वाच प्रमाणे  मिळणारे मित्रत्व.ज्यात माणसाला(विद्यार्थ्याला) स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणे अधिक असते.त्यावेळी जर निरागसता,कोमलपणा असेल तर तो बाजूला करून सत्याची जाणीव म्हणजेच गुरूत्व आणि याची जाणीव करून देणारी व्यक्ती म्हणजे गुरू.
             
माणसाला आयुष्यात शिक्षक आणि गुरु या दोघांचीही गरज असते नव्हे तर आवश्यकता असते. आयुष्याच्या प्रत्येक पडावावर ज्याप्रमाणे आई,वडील,मित्र लागतात त्याच प्रमाणे गुरू आणि शिक्षक ही लागतात.गुरू मिळाल्यावर शिक्षकाचे महत्त्व कमी होत नाही.किंबहुना ते जास्त वाढते. पाया भक्कम असेल तरच गुरूचे गुरूत्व पेलण्याची ताकद माणसात निर्माण होईल नाहीतर इमारत उन्मळून पडेल.  
             
गुरूच्या ज्ञानाचा पाया म्हणजे शिक्षक असतात त्यांनी हरप्रयत्नाने,स्वतः तोशीस सोसून प्रत्येक माणसाला आयुष्याला अभिमुख केलेले असते. म्हणूनच शिक्षक,शिक्षण,शिक्षा ही त्रिसूत्री लक्षात घेऊन पुढे वाटचाल केली तर. गुरु,गुजराण,आणि गुरूत्व ही त्रिसूत्री प्राप्त करून यश मिळवता येईल
                
- तृप्ती लोणकर
माझ्या समस्त शिक्षक आणि गुरुजनांच्या चरणी समर्पित.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान