Wednesday, December 19, 2018

गर्दीतली माणसं

गर्दीतली माणसं
                             
              काॅलेजमधून कन्सेशन घेऊन मी थिसिसच्या कामासाठी गेले होते. काम अपेक्षेपेक्षा लवकरच आटोपले. साधारण दोन अडीच वाजले होते.विचार केला आता परत काॅलेजला जाण्यापेक्षा घरी जाव.

             व्हिटीला ठाणा ट्रेन गाठली.लेडीज फर्स्टक्लास मधे कोणीच नव्हते.त्यामुळे जेण्टसच्या डब्यातच बसले. मध्य रेल्वेलाइनला इतकी कमी गर्दी फारच कमी वेळेला पाहायला मिळते नाहीतर तिन्ही त्रिकाळ. ट्रेन ओसंडून वहात असतात. काही वेळा तर अस वाटत वांती होताना जस डचमळून पोटातली घाण बाहेर पडते अगदी तसच ट्रेनच होत असणार.माणसांच्या अजीर्ण झाल्याने ती डचमळून माणसांना आपल्या पोटातून बाहेर फेकत असणार
                  आजचा दिवस अगदी मना जोगता गेला होता.मी शांतपणे  विंडोसीट पकडून बसले होते.माणसात असून मिळालेली शांतता भावली होती.ट्रेन सुरू होणार तोच एक त्रिकूट म्हणजे दोन मुलगे आणि एक मुलगी धावत ट्रेन मधे चढली.हुश्श S करत तिघेही माझ्या मागच्या बाकावर बसले होते.
          हाय ब्रो कितने साल बाद यार!हाँ यार स्कूल के बाद सात सालके बाद मिले है वाॅट्स अप क्या करते हो. मुलीने विचारले. कुछ नही यार आँख बंद करके जिंदगीके पीछे दौड रहा हूँ। ए तू क्या कर रही है। तू तो डाॅक्टर बनना चाहती थी ना?हाँ बन भी गयी.अब इंटर्नशीप कर रही हूँ। ए पण हा कोण?अरे हा माझा डाॅक्टर फ्रेण्ड आहे. व्हेरी जिनियस परसन आहे.हे डाॅक्! हा माझा स्कूल बडी.अबे साले मेरे बारेमे सब पूछा आपने बारेमे बताना जरा.

               क्या सुनना चाहती है तू मेरी शादी नही हुई अभी  तो म्हणाला तू पण ना.अगदी तसाच आहेस. ग्रो अप बेबी.अब अपने दिन है। हा हा  अपने दिन है या हम दीन है।

               मला संवादात्मक रस वाटू लागला. अरे आज वाटले होत ठाण्यापर्यंत शांत बसेन पण ए चुडैल तू भेटलीस.अबे ओ फँटम सिधे बोलना क्या हुआ है।

             अरे मम्मी का रोज का किचकिच यार.अरे शाळेत होतो तेव्हा मम्मीला फर्स्ट रँक हवा होता.तो आला तर काय फक्त ८५%मार्क आहेत ९०अप हवेत.चल आपलीच आई आहे काय मागते ९०अप परसेंट ना.म्हणून जीव तोडून अभ्यास केला.फर्स्ट रँक पण मिळवला आणि ९७%पण मिळवले आता वाटले ममा खूष असेल.पण ती हवरटा सारखे मार्क मागतच होती.मी ही ती आणि पापा खूष व्हावा म्हणून जीव तोडून अभ्यास करत होतो. अरे  डिक्सटिंगशन मधे पास झालो त्यांच्या म्हणण्याची प्रमाणे एम.बी.ए पण केल.नोकरीला लागलो पहिल दणदणीत पॅकेज घेतल.म्हटल आता तरी हिटलर-मुसोलिनी हसतीत. मला माझ्या हाॅबी साठी वेळ देता येईल.पण तिकडे पण माशी शिंकली.

                    आता सेटल होण्यासाठी सेव्हिंग्ज कर म्हणून बाबा मागे लागतो.तर माझ्या मैत्रीणीचा मुलगा यु.एस ला असतो.तू ही जा अस ममी म्हणते अरे मला इकडून कुठेही जायचं नाही.पण तिला कोण समजावणार.घरात हुंडईची कार आहे.पण ममाला मर्सिडीस हवीय.तर कोकणात आबांच एक घर आहे,गिरगावात चाळीत दोन घर आहेत.आम्ही ठाण्यात राहातो आहोत ते घर असताना मी बेटर फ्यूचर साठी पुण्यात इनव्हेस्टमेंट कराव अस बाबाच म्हणण आहे.अरे त्या साठी सकाळ पासून रात्री पर्यंत धावतोय.पण दोघे खूष नाहीत ते नाहीतच.

               साल आता जर यु.एस्.चा चान्स लागला ना तर परत इकडे येणारच नाही. काय लाईफ आहे साला फक्त चक्रात फिरायच.

                      खरच बाबाच्या लाईफ छान होत गिरगावातून फोर्टला आॅफीसला जायचं सहा वाजता घरी आला की मस्त मजेत लांब फिरायला जायचं.संध्याकाळी पाय पसरून टी.व्ही  पहायचा रात्री ममाबरोबर एक राऊंड मारायची.

             इथे साल पर्सनल लाईफच नाही राहील.फक्त आॅफीस,प्रोजेक्ट, टार्गेट,घर,गाडी,पैसा यातच फिरतोय नुसता. मला ट्रेकला जायचं आहे पण टार्गेट फीनिश केल्या शिवाय जाता येणार नाही. आणि ममी पापाच्या इच्छा कमी होत नाहीत. लहानपणी आजी मारूतीच्या शेपटाची गोष्ट सांगायची ना तस झालत. मागण्यांच्या शेपटाची लांबी वाढतच आहे.

              छोड यार तुझ बोल काय चालले आहे. तो म्हणाला. तुम्ही मुली तुम्हाला कोणी धारेवर धरत नाही.तुम्हीच बाबा,भाऊ,नवरा यांना पकडता. बस हां बस तुला काय कळणार.मला एम.एस करायच आहे.पण मग लग्नाला उशीर होईल. तो पर्यंत बाबा रिटायर्ड. होईल त्या आत माझ शिक्षण आणि लग्न व्हावे म्हणून आई खटपट करतेय. तिच्या मते योग्यवयात लग्न आणि मूल झाल की बाईला त्रास होत नाही. त्यामुळे कुठेही गेली तरी तिची शोधक नजर होतकरू डाॅक्टर शोधत असते. अरे फॅमिलीमधे लग्नाला गेल की अस वाटत पळून जाव त्या काकवा,आत्या,माम्या  यांच्या वा-याला उभ राहू नये.सतत लग्न,लाडू,पेढे याच्याच गोष्टी. मी काय शिकते,त्यात काय चॅलेंजिस आहेत. हे मला कोणी विचारतच नाही सारखे लाडू आणि पेढे कधी देणार ग तू ! अस बेंबीच्या देठापासून कोकलतात.यातून कोणी अतिउत्साही नातेवाईक खरच एखाद प्रपोजल पाठवतो.आणि आई बाबाला वेठीला धरून  सारखे नेते. मी करीयर, शिक्षण या बाबत ते दोघे सीरियस नाहीत अस नाही म्हणणार मी पण कॅज्युअलपण नाहीत.शिक्षण हव,त्याच कौतुकही आहे.पण वागणूक त्यांच्या टर्म्स कण्डिशन्स  वर हवी. सतत न येणारा स्वैपाक,न येणारी काम या वरून बोलणी खावी लागतात.त्यातून जर नाईट लागली तर आई तीन चार वेळा आणि बाबा दोनदा तरी फोन करतो.एव्हरीबडी लफ्स अॅड मी. मला काय कसाब धरून नेणार आहे का?       अस म्हणून तिघेही टाळ्या देऊन हसू लागले .
काय म्हणतोस. आमच बर असत.सतत घरी जाताना टेन्शन असत आज आई काय करेल याच.

             मी ऐकत होते.मनात विचार येत होता.आपण मुलांना अशाश्वतीच देतो आहोत का?की स्पर्धेत फक्त पळवत आहोत.आपल्या आई-वडीलांनी आपल्याकडून कसलीही अपेक्षा केली नाही.त्यामुळे त्यांच्या अपेक्षांचे ओझी आपण वाहिली नाही.तरीही आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्याच की.घरापासून लांब जाऊन रहावे अस आपल्याला कधीच वाटले नाही.

             मग आजच्या पिढीला आपण काय देतो केवळ स्पर्धाखोर वृत्ती,मुळातच आकसत गेलेला कुटुंबाचा परिघ,आणि कमी होणारी नातेवाईक मंडळी त्यातही जर केवळ मी माझ्या मुलाला घडवल या आत्मप्रौढी पायात येणाऱ्या मानसिक कमकुवतपणाला जबाबदार कोण.आपणच ना?मग पुढची पिढी बेजबाबदार कशी.असा प्रश्न मनाला सतावतच होता.उत्तर शोधायला किती वर्ष जातील हे मला माहित नव्हत कदाचित काळच त्याच उत्तर असणार होत आणि आहे.

                पण मला एक समाधान होत पुढची पिढी स्वार्थी,निखात्री,आणि निष्प्रेम नाही.ती थोडी गोंधळलेली आहे.योग्य मार्गदर्शनाखाली कार्यभाग साधेल. त्यासाठी आमच्या पिढीतला अहंकार आणि स्वच गाण  कमी केल आणि त्यांच्याशी संवाद साधला तरच हे शक्य आहे.आजची पिढी आपल्या विचारांशी प्रामाणिक आहे.तिला बुद्धीच वरदान आहे.परंतु तिची अवस्था पंख कापलेल्या पक्षा प्रमाणे करण्यात आम्हीच कारणीभूत आहोत.

                माझी उतरायची वेळ झाली होती तिघेही थोडे शांत बसलेले दिसले आता तिसऱ्या मुलाला कंठ फुटला होता.अरे भाय! आप दोनो ऐसा  नेगेटिव्ह क्यों सोचते हो.क्या अपने माँ-बाप को उनकी जिंदगी जिनेका अधिकार नही है क्या?कितने दिन ती हम उनपर बोझ बनेंगे.आपण आपल्या हिमतीने जगाव, कोणी आपल्याला हसू नये,लाचार म्हणूनये यासाठीच हे सगळ आहे असा विचार करा ना? आपण जेव्हा संपूर्ण स्वतंत्र होऊ तेव्हाच. माँ बापू आपला स्वतःचा विचार करतील.त्यांना तो विश्वास तरी येऊद्या.ब्रो डोण्ट गेट डिसापाॅइंटेड. त्यांच्या बाजूनही  विचार करा..ते जर स्वार्थी असते.किंवा आपण त्यांना नको असतो तर अॅबाॅरशनचा अाॅपशन त्यांना ओपन होता.पण तस त्यांनी केल नाही. ते आपल्या गरजा बाजूला ठेऊन आपल्या गरजा भागवत होते.ब्रो  ठाण्याच घर घेण्या ऐवजी तुझ्या बाबाबी मर्सिडीस घेतली असती तर तू अजूनही चाळीतल्या लहानशा जागेत असतास.आजच्या कम्फर्टस तुला मिळाल्या नसत्या. छोडो यार! लेक्चर द्यायच नाहीय पण त्यांचाही विचार शांतपणे करा.

           ए चुडैल तुझे माँ-बाबू कीती वर्षात लाँग व्हेकेशनला गेलेत ते सांग ग?तो म्हणाला मी सातवीत असताना आम्ही तिघे मनालीला गेलो होतो.नंतर नाही. मग त्यांना तस करयला कोणी सांगितल होत का?तो  म्हणला.नाही! ती म्हणाली.मग ए डंबो! ते का नाही गेले?त्याने विचारले.

माझ्या परीक्षांमुळे!तिन सहज उत्तर दिल. मग जर तुझ लग्न लवकर करून फ्रीली त्यांना एनजाॅय करायच असल तर? हाँ यार आमच्या लक्षात आलाच नाही हा पाॅइंट. दोघेही म्हणाले. दॅटस् व्हाय आय अॅम जिनियस.  तिसरा काॅलर ताठ करीत म्हणाला.पण त्यात गर्वाचा थोडाही अभिनिवेश नव्हता.होता तो फक्त समंजसपणा.

        मी पूर्णतः अवाक झाले.किती वेगळा विचार करीत होते मी . पण मित्रानच नेगेटिव्हीटी काढून टाकली.कोण म्हणेल यांना थिल्लर गोंधळलेले.

           कदाचित त्यांच्या आईन किंवा वडीलांनी हे ऐकल तर त्यांचे डोळे निश्चित पाणावतील.
म्हणतात ना
बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्
ही उक्ती मला मनापासून पटली आणि मी माझ्या स्टेशनला उतरले.
           
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

गर्दीतला माणूस

गर्दीतली माणस
                         
मला गर्दीत फिरण आवडत. गर्दीला आपला एक वेगळा रंग स्वभाव,आवाज असतो.त्यानुसार आपण गर्दीतली माणसं वाचत असतो.कोणी घाईतासतो कोणी अगदी रमत गमत असतो.तर कोणी पोलिसी थाटात लेफ्ट -राईट करीत चालत असतो.कोणीतरी सतत आपली नजर भिरभिरवत कोण गुन्ह्याचा तपास करीत असल्यासारखा शोधक नजरेने फिरत असतो.

               किती सवयी किती लकबी अणि किती प्रकारचे चालणे ते. आम्ही काही मैत्रिणी सुट्टीत चौपाटीवर जाऊन बसत असू आणि वेळ घालवण्यासाठी आम्ही चालण्याच्या सवयी वरून माणूस कसा असेल ते ठरवण्याचा उद्योग करीत असू.ते करताना मजेचा छंद कधी झाला ते काही कळलेच नाही.पुढे मग जेव्हा कधी प्रवासाला जात असे तेव्हा मधल्या काळात हा छंद जोपासता येऊ लागला.

               अगदी आवाजापासून ते चालणे,कपडे,केसाची स्टाईल यावरून माणूस समजून घ्यायचा प्रयत्न करीत असता.

           एक दिवस मला त्या भेटल्या कोण होत्या माहीत नाही पण साधी वायलची सौम्य रंगाची साडी.केसाचा बाळबोध वळणाचा शेपटा डोळ्याला चश्मा टापटीप म्हणता येतील अशा साधारण पन्नाशीच्या बाई.रंगाने गो-यापान जाणीवपूर्वक स्वतःला निरोगी राखण्यासाठी खटपट करीत असाव्यात असे वरकरणी वाटायला लागले.अगदी माझ्या समोर खिडकीशी येऊन बसल्या त्या माझे डोळे त्यांचा वेध घेत होते.त्या आल्यानंतर. त्यानी आपल्या पर्समधून एक फडकवजा कपडा काढला आणि खिडकीच्या कठड्यावर पसरला.दुसरा कपडा काढून. त्याने बाक पुसला अणि बोट फिरवून त्यावर. धूळ नसल्याची खात्री करून मग त्या बाकावर बसल्या.

       मी मनात म्हणू लागले आयला!बाई चळीष्ट दिसतेय बहुतेक स्वच्छतेच्या खूळ डोक्यात असणार. आईचे शब्द आठवले माणसाच्या कोणत्याही सवयीमागे काहीतरी मीमांसा असते तेव्हा अचानक मत बनवू नकोस आता नाशिक पर्यंतचा वेळ फार मस्त जाणार.तेवढ्यात अग नीला! हे घे ना असा आवाज आला आणि त्या बाई एखाद्या तरुणीला लाजवेल अशा उत्साहाने पटकन उठून पळत गेल्या. माझी मान त्यादिशेने आपसूकच वळली पहाते तर साधारण पंचावन्न साठीचे एक गृहस्थ त्यांच्या हातात तीनपुडी स्टिलचा लहान टिफिन,पाण्याच्या तीन-चार बाटल्या,केळी,चिकू,असलेली भलीमोठी पिशवी घेऊन आत आले होते.बॅग,पिशवी यांचे वजन घेऊन ते गृहस्थ वैतागल्या सारखे वाटतच होते. नीलाताईनीच त्यांच्या हातातली पिशवी घेतली आणि त्या परत आपल्या जागी येऊन बसल्या.

           का कोणजाणे पण ते गृहस्थ मला आवडले.त्या मानाने नीलाताई थोड्या रिझर्व वाटल्या.मला गाडीत बसवायला असलेल्या माझ्या भावाशी  त्या गृहस्थांच इतक छान सूत जमल  माझा भाऊ आणि ते वयातल्या अंतर विसरून गप्पा मारत होते.अगदी एकमेकांना टाळ्या देत होते..गाडी सुटायला पाच मिनीट असताना भावानी मला एक स्प्राईटची बाटली आणून दिली. त्यावेळी नीलाताईंच्या कपाळावर सूक्ष्म अाठी दिसली पण जनरेशन गॅप म्हणून मी दुर्लक्ष केल. गाडी सुरू झाली.

              काका मोठे गप्पीष्ट होते.बोलका स्वभाव असल्याने आमच्या वयातल्या अंतर राहिलच नाही.अगदी राजकारणापासून ते हाॅलीवूड,बाॅलिवूड,अमिताभ बच्चन,वर गप्पा सुरू होत्या.

               अर्थातच बिग बी आल्यावर रेखाच येणही अपरिहार्य होत.प्रथमच मी नीलाताईंचा आवाज ऐकला "बास झाला थिल्लरपणा काही वयाची चाड आहे की नाही" आमच्या चर्चेला एकदम ब्रेक लागला. आता नीलाताई माझ इनव्हेस्टीगेशन करीत होत्या.टिपिकल बायकी प्रश्न होते."लग्न झालय का?ठरलय का?नाशिकला कशाला जातेय. तिकडे कुठे उतरणार वगैरे वगैरे. प्रश्न इतक्या फोर्सनी येत होते की उत्तरं देण शक्यच नव्हत तेव्हा मी सेमिनारला जातेय मामाच्या घरी उतरणार आहे. अग! मग सेमिनारमध्ये  जेवायची सोय असते तिकडे जेवणार का? नीलाताईंनी  विचारल. नाही मामी डबा देईल! तो घेऊन जाणार. मी म्हटले. त्या वेळी त्यांचा चेहरा जरा शांत झाल्यासारखा वाटला.मग विचार केला सध्या आपले ग्रह उच्चीचे नाहीत तेव्हा मौनं सर्वार्थ साधनम् म्हणून मी स्प्राइटची गुळणी तोंडात घेऊन बसून राहिले.माझी सुटका इगतपुरी स्टेशनन केली.मी काकांना विचारल," काका वडा खाणार का?"मी आणते. त्या क्षणी काका एकदम कावरे बावरे झाले. त्यांनी निलाताईंकडे पाहिले. नीलाताई कोणत्यातरी प्रचंड दबावा खाली असल्यासरख्या दिसत होत्या. ते म्हणाले चल "मी येतो तुझ्या बरोबर वडा आणायला पण खाणार मात्र नाही." नीलाताईंचा चेहरा जरासा तणावमुक्त झाल्यासारखा दिसला.

                मी वडा-पाव घेऊन आले. नीलाताईंनी त्यांच्या पिशवीतून पोळी आणि बटाट्याच्या भाजीचा डबा उघडला.डीश काढली ती डिश टीश्यून चार चार वेळा पुसली चमचा पुसला  मग त्यात पोळी-भाजी वाढून दिली काका खायला सुरवात करणार तोच "अहो सॅनिटायझरनी हात धुवा" गरीब बिचारे काका एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे हात धुऊन एक आवंढा गिळून पोळी भाजी खाऊ लागले.नंतर नीलाताई एक पाण्याची बाटली घेऊन टाॅयलेटकडे गेल्यावर काका,एकदम घाईत असल्यासारखे मला म्हणाले  "आण आण तो वडा कर्नल नाही तो पर्यंत संपवतो" माझ्या कडून घेतला वडा खाऊन होत नाही तोच  नीलाताई टणटणतच आल्या *काय तरी बाई अस्वच्छता काही खरच नाही.कसा प्रवास करायचा या अस्वच्छतेतून.सगळी पाण्याची बाटली ओतली तेव्हा स्वच्छ वाटले* *नीला घाबरू नको आपल्याकडे अजून दोन बाटल्या आहेत त्या संपल्यातर आपण विकत घेऊ तू ट्रेन स्वच्छ कर*  😁काका हसत म्हणाले.आणि माझ्याकडे पहात डोळे मिचकावत हसत सुटले.

            माहित आहे तुम्ही माझी चेष्टा करताय पण एकदा आलेल्या अनुभवाने माणूस शहाणा होतोना! अचानक त्या माझ्याशी बोलायला लागल्या."मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे.माझा नातू आणि सासूबाई फुडपाँयझनिंग होऊन गेल्या.काय तर फक्त बटाटावडा खाल्ला त्या दोघांनी तसा आम्ही सगळ्यांनीच खाल्ला होता.मग तेच दोघे का बळी गेले?सासूबाईंच समजू शकते ग मी त्यांनी त्यांच आयुष्य परीपूर्ण जगून घेतल होत.पाण माझ्या सहा वर्षाच्या नातवाने काय गुन्हा केला होता ग! हे मेले कोणत्या तेलात काय तळतात,काय कसले अन्नपदार्थ वापरतात,हात अस्वच्छ,भांडी अस्वच्छ,माणसं अस्वच्छ मग पाॅयझनिंग होईल नाहीतर काय?येवढासा तो जीव त्याला झालेल्या उलट्या,जुलाब,त्यामुळे मलूल पडलेला चेहरा अजून डोळ्यासमोरून जात नाही.डाॅक्टरांनी त्याच्या हातापायात टोचलेल्या सुया त्याचा त्या वेदनेच्या पलिकडे पोहोचलेला जीव मी मी या डोळ्यांनी पाहिला आहे.त्याच थंड झालेल शरीर माझ्याच मांडीवर होत.काय मिळाल ते दूषित खाऊन.माझा नातू तर हातचा गेला.पण ही अस्वच्छता गेली नाही.माझ्याकडून मी माझ्या माणसाना जपण्याचा प्रयत्न करते मी काय चूक करते का ग?

             माझ्या हातातल्या कोल्ड ड्रिंकचा चहा झाला होता.कोणीतरी मस्तकावर घणाचे घाव घालून मेंदूचे चूर्ण करतेय असे वाटत होते.

           तितक्यात काका.म्हणाले त्या दिवसापासून मी प्रवासात हमाल झालो आहे.अग नीला भरून देईल ती पिशवी उचलायला हमाल तगडा हवा ना नाहीतर हमालाला सामान कस उचणार!अग मुली माझी ही जोहरजबी आहे.आणि सांग बर ही बावना वर्षाची वाटते का?पस्तीशीची वाटते की नाही.ओके नीला मॅडम आपकी इस सेहत का राज क्या है?

         "चला काही तरीच तुमच" अस म्हणत नीलाताई गप्प बसल्या तर काकांनी माझ्याकडे पहात डोळे मिचकवत निश्वास सोडला.

      आजूनही कधी प्रवासाला निघाले तरी मला त्यांची म्हणजे नीलाताईंची आठवण येते.मी प्रवासभर त्यांनाच शोधत असते.

माणसाच्या प्रत्येक सवयीमागे काहीतरी मीमांसा असतेच हे वाक्य मला नीलाताईंनी पटवून दिले.
                    
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्टान

Tuesday, December 18, 2018

गर्दीतील माणसं

गर्दीतली माणसं
                              
                 बरेच दिवसानी मी नेहमीच्या ट्रेनला म्हणजे सकाळी ७.४० ला बसले होते. उलटी ठाण्याला जाऊन मला सी.एस.टी ला जायच होत.कामामुळे ती ट्रेन गाठता येतच नव्हती.त्यामुळे त्या ट्रेनचा ग्रुप बरेच दिवसात भेटलाही नव्हता. या सगळ्या सख्या बहुतेक बँकर होत्या.त्यामुळे शिक्षण आणि शिक्षणाशी  संबंधीत चर्चा नसे त्यामुळे मी त्यांना धमाल समूह म्हणत असे.आणि ते खरेही होते.त्यांच्या ट्रेनच्या विश्वात खण्याचे पदार्थ,साड्या,दागिने,सिनेमा,पिकनिक,हाॅटेलिंग असे विषय नेहमी चर्चेत असत.तस पाहायला गेल तर मी त्यांच्यात आॅड मॅन आऊट होते.पण कशी समावले ते कळतच नव्हत.पण त्या सख्यांनी मला त्यांच्यात घेतल होत हे खर. हा ग्रुप ठाणे ते सी.एस.टी असा असायचा. एखादी बरेच दिवसानी आली की तिची फीरकी घेण हा त्या ग्रुपचा पायंडा होता.वयोगटाच म्हणाल तर साधारण पस्तीस ते एकोणसाठ असा मोठा आवाका होता.

            मला  खूप दिवसानी पाहिल्यावर सगळ्या एकदम बोलायला लागल्या कोणाला पहिल उत्तर द्यावे हे कळतच नव्हत. पण हे नेहमीचच होत. जी मुलुंडला उतरणारी होती ती उठली आणि मला राईट साईड विंडो मिळाली.या ग्रुप बरोबर असताना मला सक्त ताकीद असे पुस्तक काढायच नाही.किंवा थिसिस,सिलॅबस,यांबद्दल अवाक्षर बोलायचही नाही.

            विक्रोळी स्टेशन सुटल की सगळ्या आपले खाऊचे डबे काढत.ते काढल्यावर मोठी अंगत-पंगत होई.तोंडी लावायला,पदार्थांच्या रेसीपी,कॅलरी,कमी न होणार वजन,व्यायाम कसा जमत नाही असे हलके फुलके विषय असतच.

               ट्रेन पुढे सरकत होती .विक्रोळीला ती चढली.मला ती नवीन होती अणि तिने मला पाहिलेही नव्हते.ती आली तोच मुळी अॅमरेज परफ्युमचा सुवासान दरवळत.तोंडाने हाय,हाSSय करीत सगळ्याना हाय-फाय. देतच. सगळ्या ग्रुपच्या उत्साहात भर पडेल अस वाटत असताना सगळी हास्य बेगडी झाल्याची जाणीव व्हायला लागली.

          ती म्हणजे माॅडर्न पणाचा बेगडी नमुना वाटली. ओठाना फीकट लिपस्टिक,कोरलेल्या भुवया,आपला खरा चेहरा दिसणार नाही इतकी मेकपची चढवलेली पुट, आपण माॅडर्न आहोत ही दाखवणारी सगळी बाह्य लक्षण अंगावर खांद्यावर लेऊन होती ती आणि सगळ्यात हाईट म्हणजे इंग्रजी अॅक्सेंटल मराठी. हा प्रकार फारच मौजेचा होता.

              मला जरा मौजच वाटली.पण ग्रुपच्या दंडकानुसार गप्प बसावे जे जे दिसेल ते ते पहावे. जे ऐकायला मिळेल ते ऐकावे असे म्हणून मी निरीक्षणात मग्न झाले.

                हे कोण नवीन फाइंड तिने सगळ्याना विचारले.नवीन नाही जुनीच आहे. अग बाई !कधी दिसली नाही ती!ती म्हणाली.सगळ्या नाकं वाकड करायला लागल्या होत्या.शेवटी मीच म्हटले हाय! मी तृप्ती!नाईस नेम हं!यु आर लुकींग टु गुड बट किंचित फॅट.हे काही तरी भलतच वळण घेतय याचा अंदाज येताच  एक ताई म्हणाल्या अग भूक लागलीय! सगळ्यांचे डबे बाहेर निघाले.तिनेही आपला छोटासा डबा बाहेर काढला.त्यात पाचसहा काजू,तीन-चार बदाम,दोन अंजीराच्या चकत्या होत्या.प्रत्येकजण आपला खाऊ एकमेकीत शेयर करीत होत्या.आणि विषय होता हेल्दीफुड.

          हो ग बयानो! वि नीड हेल्दी फुड.आम्ही म्हणूनच रोज सकाळी ड्रायफ्रुटचा ब्रेकफास्ट घेतो. मी तर बाई एव्हरी सीजनला जी फ्रुटस् असतात तीच खाते. जेवणात सॅलड अगदी काकडी पासून ब्रोकोली पर्यंत रोज असत.आम्ही सगळेचजण लेस आॅयली फुड खातो.मग बघ मी कशी स्लिम ट्रिम आहे.

                मला तर अस झाल होत मी नेलेला डबा आता उघडला तर ती त्याला व्हाॅट आॅयली तुपकट अस म्हणेल.कारण माझ्या डब्यात शिरा होता. तिच्याच भाषेत सांगायच तर तो सुद्धा साS,जूक तूपातला भरपूर काजू बेदाणे घालून. प्रोटीन रिच केलेला.म्हणजे हाय कॅलरी फुडच ना.मग त्या कॅलरी जळणार कशा, आणि मी हे खाऊन वेट लाॅस कशी करणार?म्हणून मी मैत्रिणींसाठी आणलेला डबा त्यांना देऊन माझा डबा गपचुप. पर्समधे सारला.

               शिरा बघून तिच लेक्चर सुरूच होत. अग बाई किती हाय कॅलरी फुड.म्हणूनच तू अशी गोलगप्पा आहेस.आता बाकीच्यांचा संयम अगदी पराकोटीला पोहोचला होता.आमच्यातील वयाने ज्या मोठ्या होत्या ती सखी ताडकन उभी राहिली गप्प बस ती तिच्यावर खेकसलीच तुला काय कळत ग उगाच आपली उचलली जिभ लावली टाळ्याला.

            बस तेवढे ऐकायचा अवकाश तिने आपली गाडी वेगळ्याच दिशेने वळवली.तुम्हाला माहित आहे का? मी ग्रॅज्युएट आहे.आणि ते सुद्धा इंग्रजी मधे मी सतत स्टारडस्ट,फिल्मफेयर मॅगझिन्स. वाचून सगळ्या बाबतीत स्वतःला अपडेट ठेवत असते. अग टाईम्स आॅफ इंडीयातील पार्टी पेज तर इतक मस्त असत.किती इन्फरमेशन असते त्यावर.मला अगदीच खुज वाटायला लागल होत.मी अगदी गावंढळ आहे अस वाटून मी डिप्रेशन मधे जाईन की काय या विवंचनेतच मी पडले होते.तोच परळ स्टेशन आल ती उतरून गेली.आणि वातावरण एकदम नाॅर्मल झाल.

             जी सखी तिच्या समोर उभी ठाकली होती.ती इरेला पडली उद्या तिचा नक्षा उतरवायचाच काय वटवटत करते ती? मला रिंगणात घेतल गेल तिच्या इंग्रजीचा बुरखा फाडण्यासाठी मदत कर अस सांगितले गेल.

                हे आमच्या ग्रुप स्पिरीटच्या विरुद्ध होत.पण जर एका दिवसात मी इतकी वैतागले.तर रोज हे सगळ ऐकून सख्यांची काय अवस्था होत असेल.याची परीपूर्ण कल्पना आली होती.मन कचरत होत.पण हे अाॅपरेशन आवश्यक होत.

            माझा परीक्षेचा दिवस उगवला.मी डब्यात चढले तर माझी छाती धडधड करीत होती.माणूस तोडायचा होता त्याचा नक्षा उतरवून त्याच्या गर्वाच घर खाली करायच होत.मन था-यावर नव्हत.पण सख्यांसाठी हे करायच होत. ती नेहमी प्रमाणे विक्रोळीला चढली.नेहमी सारखीच अपटुडेट सुगंधाने दरवळत.

                खानपान संपन्न झाल.त्या बरोबर तेच घिसपीट लेक्चर ही ऐकल.आता माझी इनिंग होती.तुम्ही इंग्रजीत मास्टर आहात ना!  मी तिला म्हटल. होयतर! ती म्हणाली कोणत्याही शब्दाला प्रतिशब्द देता येईल? मी विचारल, हो देईन की ! इति ती. अहो! मी पी.एच्.डी.करते आहे.मला दोन मराठी शब्दाना प्रतिशब्द हवे आहेत. तिच्या चेहऱ्यावर थोडी चलबिचल दिसली.पण तिला सुटकेचा मार्ग दिसत नव्हता.कोणते दोन शब्द तिने अत्यंत पडलेल्या आवाजात विचारल.

पहिला सोवळे आणि दुसरा पुण्य आता तिचा चेहऱ्यावरचा मेकप उतरणार की काय अशी भिती मला वाटायला लागली होती. सगळ्या सख्या जणू आनंदाच्या ढगावर तरंगत होत्या.

               तू तुम्ही काय करता.तीन विचारल.अग टवळे!ती काॅलेजात प्रोफेसर आहे.पी.एच्.डी.करतेय कळल का?  सख्यानी आता तिला पूर्ण कोंडीत पकडल होत. तिच्या अपडेट राहाण्यापासून ते ड्रायफ्रुटस् पर्यंत सगळ तिला परत परत ऐकवले जात होत.आणि एकमेकींना टाळ्या देऊन आनंदोत्सव साजरा होत होता.

              मला माझीच कृती फारशी रुचली नव्हती.मी माझ्या शिक्षणाची फुशारकी तिच्या समोर मिरवली होती. हे अयोग्य होत.पण सख्यांनी मला सांगितले. अग मैत्रिणी म्हणजे फक्त वाहवा करण नसत.तर त्या आरशा सारख्या असतात. चुकलेलीच प्रतिबिंब तिला दाखवणे म्हणजे मैत्री.

            त्या नंतरच्या दिवशीही ती विक्रोळीला चढली.दुसरीकडे बसायला जात असताना समंजस सख्यानी हात धरून तिला परत घोळक्यात घेतली.त्या दिवसा पासून तिच्या बोलण्यातल इंग्रजी अॅक्सेंटल मराठी गायबच झाल आहे. आता तर ती प्रोटीनरिच फूड सोडून तूपकट,तेलकट पदार्थ चापत असते. आणि अपग्रेडेशन साठी मेनका,माहेर,लोकसत्ता,म.टा. वाचते.

मनात आल.

खरोखर खरच मैत्रिणी ह्या आरशा सारख्या असतात.
                
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्टान