धन त्रयोदशी/धन तेरस
दीपावली सणाचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी .या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.या दिवशी धन्वंतरी,देवी धनलक्ष्मी,कुबेर आणि यमधर्म यांचे पूजन करतात.
समुद्र मंथनातून द्वादशीला कामधेनु,त्रयोदशीला भगवान धन्वंतरी,आणि आमावास्येला महालक्ष्मी अवतरीत झाले त्यामुळे धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरी होते.
धन्वंतरी देवांचे वैद्य होते.ते हातात अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले.त्यामुळे या दिवशी सर्वाना आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना करतात. प्रसाद म्हणून कडूनिंबाची पाने व खडीसाखर दिली जाते.
पौराणिक कथेनुसार भगवान महाविष्णु एकदा पृथ्वी परिक्रमा करण्यासाठी निघाले असता देवी लक्ष्मी त्यांच्या बरोबर जाण्याचा हट्ट करू लागल्या.विष्णूनी ते सांगतील त्याप्रमाणे लक्ष्मी देवीने वागावे या अटीवर त्यांना बरोबर नेले.काही काळ दोघे बरोबर विचरण करीत होते त्यानंतर विष्णूने लक्ष्मीदेवीना एका स्थानी थांबून "मी दक्षिणेस कडे जातो तुम्ही या ठीकाणी थांबा "असे सांगून महाविष्णू दक्षिण दिशेला निघून गेले. देवी लक्ष्मीना राहवेना म्हणून त्याही रहस्य जाणून घेण्यासाठी महाविष्णूंच्या मागे गेल्या जात असताना वाटेत त्याना सुंदर मोहरीचे शेत दिसले ते फुलांनी भरलेले होते.ते पाहून त्या फुलांनी श्रृंगार करण्याची महालक्ष्मीला इच्छा झाली. तिने श्रृंगार केला आणि पुढे निघाल्या वाटेत त्याना ऊसाचे शेत दिसले देवी ऊस खाण्यासाठी शेतात उतरल्या ऊस घेतला त्या खात असतानाच महाविष्णू तेथे आले. गरीब शेतक-याचा ऊस न विचारता घेतला म्हणून देवींवर संतप्त झाले.त्याना शाप दिला बारा वर्ष या शेतक-याच्या घरात राहून त्याची सेवा करा असे सांगून महाविष्णू निघून गेले.
लक्ष्मी देवी सेवाव्रत स्वीकारून तेथेच राहिल्या तो शेतकरी गरीब होता लक्ष्मीदेवीनी त्याच्या पत्नीला स्वतःची एक मूर्ती दिली त्याचे पूजन करण्यास सांगितले.चमत्कार झाला. शेतक-याचे घर धन-धान्याने भरून गेले.अशी बारा वर्ष कधी सरली ते कळलेच नाही. लक्ष्मी देवींची पेरण्याची वेळ झाली तेव्हा शेतक-याला सत्य ज्ञात झाले.तो देवीना जाऊ देईना तेव्हा लक्ष्मी देवीनी त्याला सांगितले उद्या आश्विन कृष्ण त्रयोदशी आहे तू कलशात नाणी भरून पूजन कर मी कायम तुझ्या घरी वास्तव्य करीन.असे सांगून त्या स्वधामाला गेल्या.त्या वेळे पासून धनलक्ष्मीचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली.
या दिवशी यमाला दीपा दान करण्याचाही प्रघात आहे. त्या मागे असलेल्या पौराणिक लोक कथेप्रमाणे एका राजाचा मुलगा होता. तो जन्माला येताच ज्योतिषाने भविष्यवाणी केली याचे लग्न होताच चौथ्या दिवशी त्याला मृत्यू येईल त्या राजाने आपल्या मित्र राजा हेम याला सांगितले असता हेमराजाने त्या मुलाचे संरक्षण करीन असे सांगितले.हेमराजाने एक भूमीगत किल्ला निर्माण करून राजपुत्राची राहण्याची,विद्येची सोय केली मुलगा लग्नायोग्य झाला त्यावेळी त्याने एका सुंदर कन्येला पाहिले तिच्यावर मोहित होऊन तिच्याशी गंधर्व विवाह केला.
मुलीला राजपुत्राच्या अपमृत्यू विषयी कळले तेव्हा चौथ्या दिवशी तिने राजपुत्राला एका खोलीत बसवले आणि दरवाजा बंद करून दरवाज्या पुढे दागिने,सोने,चांदी, यांचा ढीग लावला ती स्वतः दरवाज्यात. बसून राहिली यमदूत सर्प रूपाने आला पण ढीग पार करण्यात यशस्वी झाला नाही त्यामुळे राजपुत्राचे प्राण वाचले.त्याची कृतज्ञता म्हणून तिने यमासाठी दीपदान केले.
कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ गंधमादन पर्वतावरच्या १/४संपत्तीचा मालक हा देवतांचा द्रव्य रक्षक आहे. तो शिव मित्र आहे त्यामुळे आजच्यादिवशी त्याचे पूजन करतात धन,धान्य,आरोग्य प्राप्ती आणि अपमृत्यू भय निवारक अशी ही धन तेरस.
सुगीचे दिवस असल्याने नवीन खरेदी विक्री याच दिवशी केली जाते.विशेष रूपाने सोने,चांदी आणि नवीन भांड्यांची खरेदी या दिवशी करतात.धर्माने घरातल्या कच-याला ही लक्ष्मी मानले आहे त्यामुळे आजच्या दिवशी घरातील कचरा काढून झाल्यावर त्याला हळद-कुंकू वाहून मग कुंडीत टाकण्याची पद्धत आहे.
या दिवशी व्यापारी वर्ग नवीन चोपड्या खरेदी करतात थोडक्यात धनतेरस म्हणजे सर्व मान्य खरेदी दिवस आहे.
अशी ही धनतेरस केवळ सण नाही तर पर्व आहे
-तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment