Saturday, November 3, 2018

रांगोळी

रांगोळी
                
       भारतीय परंपरेत रांगोळी या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. वाङमयातून. सडा,संम्मार्जन रांगोळी हा प्रकार रोजच्या जीवनातील. अविभाज्य भाग असल्याचे सांगितले आहे. संस्कृतमध्ये ‘रंगवल्ली’ अशी संज्ञा आढळते.      वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांच्या यादीत रांगोळीचा उल्लेख आहे. प्राचीन मराठी वाङ्‌मयातही रांगोळीचे अनेक ठिकाणी निर्देश आलेले आहेत. नलचंपूमध्ये (इ. स. दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचा उल्लेख आहे. गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे. मानसोल्लासात (बारावे शतक) सोमेश्वराने धुलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.

                 रांगोळी संपूर्ण भारतात शुभसूचक चित्र समजले जाते.ज्या घराच्या अंगणात रांगोळी नाही त्या घरात काहीतरी दुःखद घटना घडली आहे. किंवा त्या घरात गृहीणीचा वावर नाही असे समजतात.

मुख्यतः रांगोळीचे दोन प्रकार पडतात.
                 १) वल्लरी प्रधान
                  २)आकार प्रधान रांगोळी

               वल्लरी प्रधान रांगोळी महाराष्ट्रात प्रामुख्याने जेवणाच्या पंगतीची शोभा असते.त्यातील. नक्षीचे प्रवाहीपण अचूकसाधून सुशोभनासाठी केले जाते.त्या बरोबर काही विशेष व्यक्तींच्या ताटाभोवती काढलेल्या रांगोळीत. पाने-फुले वेल बुट्टी गोल यांचा सढळ वापर केला जातो.

           तर आकृतीप्रधान रांगोळीने महाराष्ट्रात दरवाजा बाहेरील अंगण सुशोभित केले जाते. काही वेळा काढल्या गेलेल्या बाह्य रेषांना कणा असे म्हणतात.नंतर त्या आकारांत रंगसंगती  साधून. ती आकृती सुशोभित केली जाते.

            अशाप्रकारच्या रांगोळ्या बहुतांश कोलम म्हणजे ठिपक्यांनी काढलेल्या असतात.यात काही वेळा अक्षरलेखन ही करतात. सुस्वागतम् हा शब्द हटकून दिसतोच.म्हणूनच अशा रांगोळ्या सणावाराला काढल्या जातात.

               काही वेळा कुलाचार किंवा कुलधर्माच्या वेळी ठराविक रांगोळ्या काढायची पद्धत आहे.महाराष्ट्रात. कोकणस्थ ब्राह्मणात बोडणाची रांगोळी तसेच देशस्थ ब्राह्मणात गव्हाचा चौक भरणे हे या विशिष्ट प्रकारात मोडते. नावाच्या वेळी देखील सीमा रेषा म्हणून ठराविक रांगोळ्या काढल्या जातात. तांत्रिकात देखील रांगोळी काढली जाते पण तिचा उपयोग सुशोभनासाठी  करीत नाहीत. त्याला रिंगण असे म्हटले जाते.बहुतांश सर्व प्रांतात रांगोळी काढण्याचा प्रघात भारतात आहे.

            भारतातील सर्व प्रांतात रांगोळी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. राजस्थानात ‘मांडणा' ‘सौराष्ट्रात’ ‘सथ्या’, मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशात‘चौकपूरना’ किंवा ‘सोनारख्नाआंध्रप्रदेशात ‘मुग्गू’, बिहारमध्ये ‘अरिपण’ अथवा ‘अयपन’,तमिळनाडूमध्ये ‘कोलम’, केरळात ‘पुविडल’, ओरिसात ‘झुंटी’, बंगालमध्ये ‘अलिपना’ आणि गुजरातमध्ये ‘साथिया’, कर्नाटकात   ‘रंगोली’ व महाराष्ट्रात ‘रांगोळी’ या नावांनी ओळखली जाते.
रांगोळी मुख्यतः स्त्रियाच काढतात.

               रांगोळी साधारणपणे दोन हजार वर्षांपासून काढली जाते.शिरगोळ्याचे चूर्ण किंवा भाताच्या तूसाची वस्त्रगाळ पूड करून त्या पासून ठिपके,त्रिकोण,चौकोन,गोल अशा भौमितिक आकारातून काही सांकेतिक चिन्हांच्या सहाय्याने ज्या रंगरेखा काढल्या जातात त्यामुळे घराचे दार,अंगण सुंदर दिसरतेच पण किडा,मुंगी,बारीक बारीक कीटक त्या परिसरात फिरकत नाहीत. हल्ली तांदुळाच्या पिठात फेविकाॅल. घालून कायम स्वरूपी रांगोळी रेखतात.

                    रोजच्या रांगोळ्यांमधून गोपद्म,कमळ,श्रीपादुका,कासव,चंद्र, सूर्य,बिल्वपत्र, शंख चक्र,स्वस्तिक इ.  चिन्हांनी आंगण सुशोभित केले जाई.हे आकार रंगीत करण्यासाठी,हळद,कुंकू गुलाल यात थोडी रांगोळी घालून योग्य रंगसंगतीने सुशोभित केले जात असत.

                आधुनिक काळात रांगोळीचे प्रकार बदलत गेले. केवळ बाह्य रेषा काढून त्या मधे वेगवेगळे रंग भरता येवू लागले आहेत. ठिपक्यांच्या सहाय्याने पोखरण, कमळ, बदके, राजहंस आदी चित्रे काढून त्यात अनेक रंगांच्या छटांनी ते रंगवले जात आहे.

                  साधारण दोन दशकांपासून संस्कारभारतीची रांगोळी हा प्रकार प्रचलित झाला आहे.पार्श्वभूमीला एखादा गडद रंग घेवून त्यावर दुस-या रंगाने वेलबुट्टी भौमितिक आकार काढून त्याची बाॅर्डर पांढऱ्या रांगोळीने उठावदार करून सण समारंभात रंगत आणली जाते.

                पेशवाईत जेव्हा जेवणाच्या पंगती बसत असत तेव्हा पानाभोवती रांगोळी काढण्याची प्रथा होती.यात. कलेची श्रीमंती दाखवणे,पंगतीला बसणा-या माणसाचे मन प्रसन्न करणे आणिअन्नाची सुरक्षा हे हेतू असत.

                     सणावाराची रांगोळी ही वेगळी असे.दिवाळीत लक्ष्मी पूजनाला सारीपाटाचा पट काढला जाई.चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी चैत्रांगण काढतात,अगदी संकष्टी चतुर्थीच्या दिवशीही  चंद्र दर्शन घेता न अाल्यास. रांगोळीने पाटावर चंद्र काढून व्रताचे उद्यापन करतात(उपवास सोडतात).

               मंगळाचा गौरीच्या पूजेला चौरंगावर भोवती महिरप काढून पुढे चौक भरला जातो. हल्ली तर पाने, फुले फुलाच्या पाकळ्या, पाने बारीक चिरून त्यांच्या सहाय्याने रांगोळ्या काढल्या जातात.

              रांगोळी किंवा रंगवल्ली आरेखन ही चौसष्ट कलांमधील एक कला आहे.कालानुरूप तिचे प्रकार बदलेले अाहेत हल्ली पोर्टेट रांगोळी हा प्रकार माणसाना आवडू लागला आहे.

               शहरात जागेची कमतरता असल्याने पुठ्ठ्याचे,ओ.एच्.पी.शीट.कचकड्याचे आकार कापून कुंदन, मोती, खडे यांनी सजवलेल्या पोर्टेबल रांगोळ्यांच्या स्वरूपात त्या दिसत आहेत.

              पारंपारिक रांगोळीचे स्वरूप जरी बदलले असले तरी रांगोळीचा हेतू शुभसूचक. चित्र हाच आहे. हजारो वर्ष बायकांनी पिढी दर पिढी जतन केलेली कला अजूनही माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. माणसांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
                  




-  तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment