दिवाळीचा खरेदी महोत्सव
लहानपणी दिवाळीची वाट पहात असायचो.त्यावेळी दिवाळी अगदी खरी-खुरी दिवाळी असे. फटाके,कपडे,वेगवेगळ्या फराळाच्या पदार्थानी गच्च भरलेले डबे आणि एकमेकाना शुभेच्छा द्यायला येणारी खूप खूप माणसं खूप मजा होती
दिवाळी सुरु होण्या आधी यावर्षी कोणत्या रंगाचा फ्राॅक घ्यायचा किंवा स्कर्ट-ब्लाऊज घ्यायचा यावर मैत्रीणीत चर्चा चालायची. त्यात एखादीचा काॅलेजमधे जाणारा भाऊ एक्स्पर्ट असायचा पेपरमधे आलेले माॅडेलचे फोटो पाहून आम्हाला कोणते कपडे चांगले दिसतील याच्या एक्स्पर्ट काॅमेंट आणि टीप्स् मिळायच्या.मग कोणाचीतरी ताई रंगसंगती सूचवायची अशी सगळी ठरवाठरवी होई पर्यंत खरेदीचा दिवस उगवायचा.
त्या दिवशी आईला सकाळपासून मुकाट्याने मदत करायची नाहीतर बाजारात जायला उशीर व्हायचा. आपल्याला जे हवे आहेत ते कपडे घ्यायला आढेवेढे घेऊ नये म्हणून मस्का मारण असायच ते. सगळ्यांची जेवण-खाण आटोपली की आई,काकू मी आणि माझी बहिण अशी वरात खरेदीला बाहेर पडायची
मनात असलेल सगळ डोक्यात घेऊन आम्ही बाहेर पडायचो.सगळ्यात पहिल्यांदा लहानांची खरेदी त्यांचे तयार कपडे घ्यायचे त्यासाठी ढीगभर कपड्यातून. प्रत्येकी दोन कपडे निवडले जायचे. अस क्रमाक्रमाने आमची वेळ यायची. पण त्यावेळीच नेमक आईसाहेबांच फर्मान निघायचे रेडिमेड नको.लवकर तोकडे होतात कपड्याच्या शिवणीला माया नसते मग काय त्या दुकानातून बाहेर पडायची.
मग मावळंकराच्या दुकानात मोर्चावळे बहिण -भावाचे कपडे घेऊन झाले असल्याने खरेदीतला त्यांचा इंटरेस्ट संपलेला असायचा त्यांची कुरकुर सुरू झालेली असायची अणि योगायोग म्हणा किंवा ठरवलेला योग म्हणा काका रस्त्याने जाताना दिसायचा त्याच्या बरोबर खरेदी केलेले कपडे आणि बच्चे कंपनी घरी रवाना व्हायची मग मी,काकू आणि आई अस त्रिकूट मावळंकराच्या दुकान जायचो. दुकानात गेल्यावर खूप आनंद व्हायचा आता आपल्याला हव ते मिळणार पण हा भ्रम लगेचच दूर व्हायचा आई आणि काकू त्याना आवडेल तेच कापड फ्राॅसाठी घ्यायच्या.मला फक्त हो म्हणण्याची मुभा असे म्हणजे
वहिनी हा आकाशी रंग बघा छान आहे. इति काकू
काकू मला तो गोळ्या गोळ्यांचा हवाय .त्या पेपर मधे होताना तसा आहे मी मधेच पिल्लू सोडल
पण काकूचे वटारलेले डोळे पाहून पुढचे शब्द घशातच अडकायचे.
मग आई -काकूच्या संगनमताने जो रंग घेतला जाई तोच फॅशनेबल असे.दोन साधी कापड आणि एक जरा बाहेर जाण्या योग्य त्याबरोबर आई, काकूच्या साध्या साड्या घेऊन अस्मादीकांच त्रिकूट बिल द्यायला जायचं तेव्हा अस वाटायचं जाऊदे नकोच तो फ्राॅक आणि त्यात मावळंकर काका विचारायचे काय ग!मनासारखं कापड मिळाल का?काय ग वहिनी या दोनच साड्या उद्या परवा आणखीन नवीन येतील.
मग निरोप पाठवा ह्यांना घेऊन येते. इति काकू ये हो मावळंकर. अस बोलणे होईपर्यंत बिल घेऊन होई. आणि अर्ध्या उत्साहात आम्ही बाहेर पडत असू.
मगचा पडाव म्हणजे शिंप्या कडे जाण दुकानातून बाहेर येताच आई फर्मान काढायची विद्या तू आणि तृप्ती जाऊन मुसळे काकूना आणि कुंदनला सांगून या म्हणजे आजच आठ वाजेपर्यंत. कपडे शिवायला जातील मी घरी जाते स्वयपाकाच बघते.मग मी आणि काकू एका वाटेने आणि आई दुस-या वाटेने वळणार तोच आईची हाक यायची विद्या बटाटे संपलेत ते एक किलो आण आणि मिरचा कोथिंबीर हो म्हणून मग आम्ही दोघी भाजीच्या शाॅपिंगला जायचो.
घरी येई पर्यंत. सात साडेसात झालेलेच असायचे. आईने स्वैपाक काकूंच्या मदतीने केलेली मुगाच्या डाळीची खिचडी पापड आणि कोशिंबीर असा जेवणाचा बेत असायचा.जेवण होऊन आवरत नाही तो
मुसळे काकू यायच्या मुसळे काकू म्हणजे घरगुती शिवण शिवणा-या फॅशन डिझायनर आईचे काकूचे साध्या साड्यांवरचे सुशोभित ब्लाऊज आणि घरच्या पोळ्याकाकू,स्वयपाककाकू आणि धुणीभांडी मावशी यांचे झंपर शिवणा-या मास्टर टेलर त्यानी त्यांच्या पद्धतीने डिझाईन करून घरात घालायचे फ्राॅक शिवायचे. त्यांना जर पेपर मधला फ्राॅक दाखवला तर हे असले फ्राॅक घालून नटी का व्हायचय हे ऐकून गप्प बसायची.
कुंदनलालजी हा दुसरा मास्टर टेलर हा काकूचे आईचे कटोरी व फॅशनेबल ब्लाऊज,आणि बाहेर जायचे फ्राॅक शिवयचे त्यांच्या ताब्यात कापड देऊन गुडघ्या खाली दोन बोट येईल असा फ्राॅक शिऊन यायचा.
त्या नंतरचा दुसरा दिवस म्हणजे काकाबरोबर जाऊन फटाके आणणे. महमद अली रोडच्या ईसाभाई फटाकावालाच्या दुकानात भाऊ,काका,मी अस त्रिकूट जायचं तिकडे गेल्यावर काय घ्यायच ह्याची गल्लत होऊ नये म्हणून आधीच लिस्ट करायची.पण मजा अशी दुकानात गेल्यावर मात्र भंबेरी उडत असे.हे घेऊ की ते घेऊ अशी परिस्थिती होई. तेव्हा काका आणि त्या दुकानाचा सेल्समन मदतीला येत असे.
यात माझ्या पेक्षा भावाला जास्त इंटरेस्ट. असे. बाबा तुझ्यासाठी पायजे फटाकडी सेल्समन विचारे
हो भाऊ मंग तू हा झमीन चक्कर घे,हे फुलभाजीचा अख्खा पेकेट घे.सगले फटाकडे लावायला लागते ना मोठा आवाजचा फटाकडीने तू घबरशील. तरीही लवंगी,डांबरी केपा,रोल आणि बंदूक हे सगळे एका बांबूच्या करंडीत बांधून आम्ही घरी येत असू.त्यावेळी हे फटाकडी उन्हात थोडा वेळ गरम कर हा बाबा अस सांगत कॅश कौंटरवरचे म्हातारे काका एक केपांच पाकीट हाती देत असत.
मग त्याच दिवशी येता येता कंदिलाचे सामान आणि खास माझ्या साठी किशोरचा दिवाळी अंक आणि गोष्टीची बारा पुस्तक विकत घेऊन आमच्या खरेदी मोहोत्सवाची सांगता होत असे
दिवाळी आल्यावर ,आताही बरच काही खरेदी करते पण. त्यात तो महोत्सवी उत्साह आणि आनंद या दोन्ही बाबी मिळत नाहीत ती नेहमीची जरूरीची खरेदी असते दिवाळीची खरेदी नसते.
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान




