Tuesday, September 18, 2018

संवाद

संवाद
                         
सम्यक वचनेन परस्परं वदति सःसंवादः अशी जरी संवादाची व्याख्या केली तरी संवाद हा दोन व्यक्तीमधील बोलणे येवढ्यापुरताच मर्यादित नसतो. तर जेव्हा वैचारिक पातळीवर दोन व्यक्ती एकमेकांसमोर येतात त्या वेळेस त्यांच्यात जे सामंजस्य निर्माण होते.तो खरा संवाद.
                
मग परस्परांशी होणारे बोलणे म्हणजे काय? कित्येक वेळा बोलणे ही क्रिया जरी दोघांत होत असली तरी ती एकतर्फी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.दुसरे विचार ऐकून न घेता मत बनवणं म्हणजेच एकतर्फी असलेला संवाद असे म्हणावे लागेल.त्यातून संवादाची प्रक्रीया सुरू न होता विसंवाद,वितंडाची प्रक्रिया सुरू होते.
            
मग असा प्रश्न पडतो संवादाची प्रक्रिया सुरू केव्हा होते?ती कोणाशी सुरू होते?
            
संवाद हा आध्यात्मिक असतो.होय अध्यात्मिक म्हणजे आधी(प्रथम) आत्मिक(स्वतःशी) म्हणजेच सर्व प्रथम संवाद स्वतःशीच सुरू होतो.
                 
स्वतः करीत असलेली कृती इतरांच्या नजरेत कशी असेल? त्याने कोणी नाराज होतील,दुखावले जातील का? किंवा माझे विचार जे मी बोलू इच्छित आहे हे  माझ्यामधील निराशा, अतिउत्साही, किंवा अतिरिक्त दुःखाचा अथवा सुखाच, आत्मप्रौढीच प्रदर्शन तर ठरणार नाहीत ना?

दुःख/सुख प्रदर्शन करताना किंवा  त्याबद्दल बोलताना ऐकणारा कंटाळणार नाहीना?या गोष्टीचा नीट विचार करून प्रदर्शित केलेले विचार संवाद या प्रक्रीये पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करताना दिसतात.
          
चाटूकारीता हा देखील एक संवादाचा प्रकार आहे म्हणतात ना प्रियवाक्य प्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः. अगदी योग्य अवतरण आहे.पण प्रिय म्हणजे केवळ. श्रोत्याला आवडेल असे बोलणे नव्हे.थोडक्यात सांगायचं त् चाटूकारिता म्हणजे हाँजी हाँजी करणे.यातून संवाद साधला जातच नाही तर असलेल्या विचारांचे  गर्व मिजास,माज अशा संकल्पनांमध्ये परिपाक. होत असतो.
                  
संवादाच्या प्रक्रियेत अविचार,भिडस्तपणा हे दोन शत्रू उभे असतात. विवेक न करता अविवेकाने बरळणे हा एक संवाद प्रक्रियेतील मोठा अडसर असतो.दुस-या शब्दात सांगायचे तर. हा काय बोलणार,सवतःला काय ढुढ्ढाचार्य समजतो किंवा समजते ,आम्हाला शिकवतो काय? असे म्हणत जेव्हा मुद्दे खोडण्यासाठी अविवेकीपणाने आणि आक्रमकतेने मुद्दे मांडणे.होत असते. म्हणजे वादासाठी वाद. करण्यासाठी  बोलणे होते या ठिकाणी संवादापेक्षा मान-अपमान-सन्मान,आदर,अनादर  अशा संकल्पना डोके वर काढतात.आणि संवाद तर होतच नाही पण वितंडा ही पराकोटीचा होऊन समाजात शोभा मात्र होते.
            
अविचारा प्रमाणे मी हे बोलू की नको त्याने माझ्यावर आक्रमक हल्ला केला तर? किंवा माझे बोलणे ऐकलेच नाही,अपमान केला तर? नकोच ते बोलणे असा भिडस्तपणाही संवादाच्या प्रक्रियेत घातक असतो.त्यामुळे कित्येकदा समाज विचाराधीन संकल्पनेच्या एखाद्या नव्या पैलूला मुकतो.
          
थोडक्यात काय तर समतोल विचार, आत्मसन्मान आणि परापमान याचे भान आणि सुसूत्र विचारसरणी,आणि आकर्षक मांडणी,विवेकीपणा  हे संवादाचे पैलू ध्यानात घेऊन जे बोलणे होते तोच संवाद किंवा सुसंवाद ठरतो.
                 
अशा संवाद प्रक्रियेची समाजाला आणि प्रसारमाध्यमांना गरज आहे.
                      
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment