शिक्षक आणि गुरु
साधारण पाचवी सहावीत असतानाची गोष्ट आहे. शेजारच्या आजींबरोबर काळ्यारामाच्या देवळात कीर्तन ऐकायला गेले होते. ह.भ.प.आफळे बुवांचे कीर्तन होते.काय संदर्भ आला तो आठवत नाही पण त्यांनी अहो आम्ही साधे शिक्षक आम्ही अध्यत्माची गोडी लावणार! तुम्हाला गुरूत्व पहायचे असेल तर गोराराम मंदिरात जा ह.भ.प.रामदत्तबुवा देशपांडे यांच कीर्तन ऐका.
त्यावेळी काहीच कळत नव्हत पुढे इतकच कळायला लागल की गुरु आणि शिक्षक हे दोनही समानार्थी शब्द आहेत. पण ह.भ.प. आफळेबुवांचे वाक्य काही पिच्छा सोडत नव्हते. वाटायचं अस का बोलले बर ते?
आता जेव्हा विचार करते तेव्हा त्यातल तथ्य कळत आहे. खरच शिक्षक आणि गुरू यात महदन्तर आहे.
शिक्षक शब्दामधे एकप्रकारचा जिव्हाळा,प्रेम,माया या बरोबरच अनुशासन आहे.अल्लड वयात समाजाभिमुख करण्याची ताकद केवळ शिक्षकाचीच असते.
सर्वसामान्य अर्थाने पहाता शिक्ष् शिकविणे,शिस्त लावणे,शासन करणे असे एक ना अनेक अर्थ घेऊन हा शब्द येतो.आणि म्हणूनच प्रथमिक स्तरावरचे आध्ययन म्हणजे शिक्षण असते. यात व्यवहारापासून ते वागणुकीत पर्यंत बोलावे कसे,उठावे,कसे,कधी कसे खावे, खाताना पानात अन्न विखरू नये, तोंडाचा मचमच असा आवाज करू नये अशा अनेक बारीकसारीक गोष्टी एकत्रित असतात. याचे मायेने शिक्षण देणारे असे शिक्षक असतात.
शिक्षक ह्या शब्दाची व्याप्ती पहाता आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. आयुष्यात काय करावे ह्याची जाणीव करवून देण हे शिक्षकांच काम असते.तेही अगदी आईच्या मायेने विद्यार्थी घडवण हे शिक्षक करतो.अगदी केलेल्या कागदाच्या होडीच मनापासून कौतुक करण्या पासून ते आज मला आईन मारल माझी आई वाईट आहे.असे निरागस बोल ऐकून त्याचं समाधान मिळण्याची एकमेव जागा म्हणजे शिक्षक.तर तू चुकलास तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळणारच ते आज दोन दिवस तुझ्या डब्यात चकली वेफर्स असे का आहे.आई घरी नाही का?अस म्हणत स्वतःच्या डब्यातली पोळी-भाजी खायला घालण्याच आईच कर्तव्य करणारा शिक्षक असे म्हणता येत म्हणजेच
अायुष्याला वळण लागण्याच्या वेळी जो आपली संगत सोबत करतो.जगाच्या दृष्टीने पोरकट ठरणार-या शंकांची सोप्या पद्धतीने उत्तरे देऊन व्यक्तिमत्व सकारत्मकते कडे वळवताना.साम,दाम,दंड,भेद प्रकारांचा उपयोग करून ओबडधोबड दगडाचा त्याच्या नकळत चिरा करणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक होय.
मग गुरु म्हणजे काय?गुरू म्हणजे वडिलांची त्रयस्थ वृत्ती नियमीततेची शिस्त आणि सोळाव्या वर्षी मिळणाऱ्या वडिलांच्या मित्रत्वाच प्रमाणे मिळणारे मित्रत्व.ज्यात माणसाला(विद्यार्थ्याला) स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणे अधिक असते.त्यावेळी जर निरागसता,कोमलपणा असेल तर तो बाजूला करून सत्याची जाणीव म्हणजेच गुरूत्व आणि याची जाणीव करून देणारी व्यक्ती म्हणजे गुरू.
माणसाला आयुष्यात शिक्षक आणि गुरु या दोघांचीही गरज असते नव्हे तर आवश्यकता असते. आयुष्याच्या प्रत्येक पडावावर ज्याप्रमाणे आई,वडील,मित्र लागतात त्याच प्रमाणे गुरू आणि शिक्षक ही लागतात.गुरू मिळाल्यावर शिक्षकाचे महत्त्व कमी होत नाही.किंबहुना ते जास्त वाढते. पाया भक्कम असेल तरच गुरूचे गुरूत्व पेलण्याची ताकद माणसात निर्माण होईल नाहीतर इमारत उन्मळून पडेल.
गुरूच्या ज्ञानाचा पाया म्हणजे शिक्षक असतात त्यांनी हरप्रयत्नाने,स्वतः तोशीस सोसून प्रत्येक माणसाला आयुष्याला अभिमुख केलेले असते. म्हणूनच शिक्षक,शिक्षण,शिक्षा ही त्रिसूत्री लक्षात घेऊन पुढे वाटचाल केली तर. गुरु,गुजराण,आणि गुरूत्व ही त्रिसूत्री प्राप्त करून यश मिळवता येईल
- तृप्ती लोणकर
माझ्या समस्त शिक्षक आणि गुरुजनांच्या चरणी समर्पित.
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment