हरितालिका
व्रत स्त्रीच्या दुर्दम्य दृढनिश्चयाचे
भाद्रपद शुद्ध तृतीयेला समस्त स्त्रीवर्ग हरितालिका व्रत करीत असतो.या व्रताच्या कहाणीतही व्रतात व्रत हरितालिका व्रत असे म्हणतात.काय आहे हे व्रत.पार्वती मातेने सांबसदाशिव शंकरच आपला पती व्हावा या उद्देशाने केलेली शिव आराधना असे या व्रताचे स्वरूप आहे.
या व्रताची कथा पाहता आपल्या पित्याने निवडलेल्या श्रीमंत पतीची राणी न होण्यासाठी स्वतःला आणि शरिराला कष्ट देववून आपल्या इच्छितासाठी अपार कष्ट सोसण्याची ही कथा आहे.
वास्तविक पहाता पार्वती माता आपल्या मातापित्याचे शेंडेफळ त्यामुळे लाडाकोडात वाढणे अपेक्षितच होते.पण म्हणतात ना कोणतीही गोष्ट अति असेल तरी वाईटच बहुतेक तसेच पार्वतीदेवींचे झाले होते.सतत छानछोकीत रहाणे, श्रीमंती थाटात वागणे,बोलणे या पुढे शिवाचे साधे रहाणे,साधा आहार-विहार याचे आकर्षण वाटणे सहाजिकच होते. मग मनाने ते रहाणीमान आवडते आहे.आणि पिता आपल्याला परत श्रीमंती वातावरणात ढकलणार. असे कळताच.ते नाकारण्यासाठी पळून जाणे.
हे पळून जाणे स्वतः पार्वतीमातेला अशक्य होते म्हणून तिच्या सख्यांनी तिला पळवून नेले म्हणूनच या व्रताचे अभिधान हरिता आलिका हरिता म्हणजे पळवलेली तर आलिका म्हणजे मैत्रिणी म्हणूनच. आजच्या दिवसाला आपण शिवा बरोबर सखी पार्वतीचे पूजन करतो.
खरे पाहता हे व्रत इच्छित वरप्राप्ती साठी कुमारिका करतात.तर पतीच्या आयुरारोग्यासाठी सवाष्णी करतात.पण हे व्रत तर स्त्रीच्या दुर्दम्य निश्चय शक्तीचे धादांत उदाहरण म्हणावयास हवे.एखाद्या गोष्टीचा स्त्रीने घेतलेला ध्यास पूर्ण करण्यासाठी स्त्री किती पराकोटीचा सकारात्मक प्रयत्न करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हरितालिका हे व्रत आहे.तसेच केवळ मानमरातब,पैसाअडका,या बेड्यांत अडकून पडता स्वतःचे आयुष्य स्वतःच्या पद्धतीने घडवण्यासाठी समर्थ असलेली पार्वतीमाता.आपल्या निश्चयाने सकल ब्रह्मांडाला सक्रिय करते.तिच्या आणि शिवाच्या विवाहासाठी सप्तर्षी,ब्रह्मदेव,अगदी ज्याच्याशी पित्याने विवाहाचा घाट घातला होता त्या महा विष्णूना देखील मध्यस्थी करावयास भागपाडण्याचे सामर्थ्य तिच्या निश्चयात सामावलेले आहे.
हा विवाह आपणास सुखकर होईल किंवा नाही याची सुतराम शंकाही तिच्या मनात नाही.तर जगापासून अलिप्त असलेल्या महादेवांच्या मनी अनुराग उत्पन्न करण्यापासून ते कैलासावर वास्तव्यापर्यंत येणाऱ्या अनेक अडचणी सहज लांघून जात ती शिवाशी अद्वैत साधण्यात यशस्वी होते. इतके कठीण आणि आमूलाग्र होणारे बदल सहन करण हे केवळ निशचयाच्याच बळावर शक्य होत. म्हणूनच डोळसपणाने आणि सारासार विवेकाने केलेले निश्चय जगातही क्रांती घडवतात हे दाखवून देण आणि दृढनिश्चय या गुणाची महती सांगण्यासाठी या व्रताची योजना झाली असावी.
केवळ निश्चय असून काही भागत नाही.तर त्याला समाजाची स्नेही-सोबत्यांचीही जोड लागते.तिच जोड पार्वतीमातेच्या सखीन तिला दिली. तिन नुसती सोबत केली नाही तर तिच्या बरोबर ती तो प्रत्येक क्षण जगली.तेही कोणत्याही फलाची अपेक्षा न ठेवता. अगदी निष्कामपणे तिन पार्वतीमातेच्या ईप्सिताच्या साधने मध्ये तिची संगत सोबत केली.या ऋणातून उतराई होण्यासाठी सखीपार्वतीच पूजन करतात.
या दिवशी निराहार राहत असतात.तर अग्निच्या संपर्कात आलेल्या पदार्थाला ऐवजी फलाहार करणे अपेक्षित असत.वैद्यकशास्त्रानुसार पहाता श्रावणातील व्रत वैकल्याने पोटाची लागलेली वाट आणि पचनशक्तीवर पडलेला अतिरिक्तताण दूरकरून डिटाॅक्सिफीकेशनचाच हा प्रकार आहे.या दिवशी निर्जलोपवास करून रुईचे पानावर मधचाटून उपवास सोडण्याची पद्धत आहे. असे व्रत करण्यासही निश्चय लागतोच तर शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरिरस्थ उष्णता बाहेर टाकता येते.असा ऋतुमानानुसार आहार या व्रताचे वैशिष्ट्य आहे.
अशाप्रकारे हे व्रत म्हणजे हरप्रिया हरितालिका म्हणजेच स्त्रीशक्तीच्या दुर्दम्य दृढनिश्चयाच व्रत तुम्हा आम्हा समस्त स्त्रीवर्गाला सुफळ संपूर्ण होवो.
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment