चंद्र
काव्याला आणि कवीला पहिल्या पासून चंद्राचे अतीव आकर्षण आहे.त्यामुळे आपल्या अत्यंत आवडत्या गोष्टीला चंद्राची उपमा कवी नेहमीच देत असतात.
काही वेळा चंद्र हा अप्राप्य गोष्टीचे द्योतन करतो. हिंदीत तर चाँद तारे तोड लाना या वाक्प्रयोगाने दाखवतात.
असा हा सुंदर धवल वाटोळा आणि तेजस्वी चंद्र सौंदर्याचे लक्षण मानतात.प्रेयसीला "चंद्रानना" म्हणून गौरवताना चंद्रावर असलेला कलंक हा प्रेयसीच्या कपाळावरील गोल कुंकवाची जागा घेतो आणि प्रियकराच्या मनाला आल्हादक,शीतलता प्रदान करणारे असे सौंदर्य असल्याने त्या सौंदर्याला असीम भाग्याची झालर प्रदान करून जातो. ज्याप्नमाणे पूर्णचंद्राचे दर्शन आल्हादक असते त्याप्रमाणे पतीप्रियकरालाआपल्या प्रेयसीचे दर्शन आल्हादक वाटते.त्या नंतरच तो श्रृंगार रससागरात आकंठ बुडून त्याचा आस्वाद घेतो.
श्रृंगारासाठी आतुरलेली माणसे संकेत देण्यासाठी म्हणतात चाँद मातला आहे असे म्हणतात .असा हा चंद्र श्रृंगाराचा बादशहा जो उत्कट मनोमिलनाचे प्रतीक आहे.
हा आल्हादक चंद्रमा मात्र शापित असल्याची कथा ऐकावयास मिळते आणि कशामुळे शाप मिळाला तर प्रेयसीला पत्नीला भेटण्याच्या अनावर ओढीने तोही प्रेयसीच्या पित्या कडून शापित झाला. म्हणतात ना सज्जन स्वतः दुःख ताप सहन करतात पण दुस-याला मार्ग दाखवतात म्हणूनच कदाचित प्रेमिकांचे दुःख चंद्र जाणून घेतो.
प्रजापतीच्या सत्तावीस मुलींचा पती असलेला चंद्र प्रजापतीच्या रोहिणी नावाच्या मुलीवर आसक्त होता, त्याचे तिच्यावर निरतिशय प्रेम होते.तो इतर सव्वीस जणीना टाळून फक्त रोहिणीला भेटत असे.अशाप्रकारचे अपमानित जीवन रोहिणीच्या सव्वीस बहिणींना असहाय्य झाल्याने त्यांनी पित्याकडे तक्रार केली.प्रजापतीने चंद्राला केवळ रोहीणी सोबत प्रेमालाप करताना पकडले. जाब विचारल्यावर चंद्र तेजोहीन झाला.चंद्राला त्याने सव्वीस जणींवर केलेल्या अन्यायाचे फलित म्हणून पंधरा दिवस कले कलेने कमी होण्याचा शाप प्रजापतीने दिला.
रोहिणीच्या आर्जव -विनंत्यांनंतर पंधरा दिवसानी कले कलेने वाढण्याचा उश्शाप रोहीणीने मिळवला. कलेकलेने कमी होण्याच्या याकाळात चंद्र आपल्या रोहीणी खेरीज इतर पत्न्यांच्या सहवासात असतो. अप्रिय पत्न्यांच्या अप्रिय सहवासाने पंधरा दिवस खोल निराशेच्या डोहात बुडून जातो. कलेकलेने कमी होत जातो.आणि एक दिवस संपूर्ण नाहीसा होतो.
पंधरा दिवसानी परत आपल्या प्रिया रोहिणीला भेटायला मिळणार या आशाने पुढचे पंधरा दिवस कलेकलेने वाढत असतो. पंधराव्या दिवशी तो आपल्या पूर्ण वैभवाने नटून थटून रोहिणी समोर येतो. पूर्णत्वास प्राप्त होतो. म्हणजेच तो अत्यानंदात आणि सुखसागरात आकंठ बुडलेला असतो.
कदाचित म्हणूनच पौर्णिमेच्या पूर्णचंद्राला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.
शरद ऋतुत चंद्र आपल्या कलांच्या,तेजाच्या आणि शीतलतेच्या चरम सीमेवर असतो म्हणून "जीवेत् शरदः शतम् " या आशीर्वादपर शुभेच्छा मंत्रात त्याची परिणती झाली.
चंद्राच्या किरणात जीवनदायीनीशक्ती असते.त्यामुळे बहुतेक आयुर्वेदिय वनस्पती या चंद्रविकासी असतात.असे म्हटले जाते चंद्र वनस्पती आणि अोषधीपती असल्याने औषधी वनस्पतींचा प्राण आहे.तो आपल्या किरणांद्वारे वनस्पतीत अमृतसिंचन करतो.
विज्ञान काहीही असो काव्यात चंद्राला अनन्यासाधारण महत्त्व आहे. चंद्राशिवाय पृथ्वीला पूर्णत्व नाही तसे श्रृंगार आणि जननासाठी निमित्त असलेल्या भावभावनांना पूर्णत्व नाही.
यामुळेच ज्योतिषशास्त्राने मनाचे कारकत्व चंद्र या ग्रहाकडे दिले आहे.पूर्णचंद्राच्या दिवशी आणि गुप्तचंद्राच्या दिवशी म्हणजे पौर्णिमा अमावास्येला माणसाच्या भावनांचा उद्रेक अतिरिक्त प्रमाणात असतो.असे म्हटले जाते.
धन्यवाद!!
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:
Post a Comment