रियाज
अस म्हणतात गाता गळा आणि शिंपता मळा हा नेहमी चांगला असतो.होय गळा गाता ठेवण्यासाठी गायकाला रियाज करावा लागतो. काय असतो हा रियाज. इंग्रजीत ज्याला प्रॅक्टिस म्हणतात.तोच रियाज तुम्ही त्याला सराव म्हणा किंवा काही म्हणा प्रकार तोच.
गुरूने शिकवला सरगम जसाच्या तसा गळ्यात बसवायचे एक प्रभावी माध्यम म्हणजे रियाज. रियाज करण्याची ही एक पद्धत असते.
ब्रह्म मुहूर्ताला उठून नित्यकर्मे आटोपून शूचिर्भूत होऊन रियाजाला बसावे.रियाजाला सुरवात करण्याआधी सर्वप्रथम. प्राणायाम करून श्वास नियंत्रित करावा त्या नंतर ओंकार ध्यान करणे आवश्यक असते.अोंकार उच्चारण करताना दीर्घश्वास घेऊन अ उ म् असे क्रमाने उच्चार करावे अशी पद्धत आहे.यामुळे रात्रभरात जड झालेला गळा पूर्ववत होण्यास मदत होते.
आता पेटी किंवा तानपूरा लावून साधारण पंधरा मिनिटांत पर्यंत. आपण ज्या पट्टीत गातो त्याच्या मध्य सप्तकातील "सा"हा स्वर लावावा."सा" लावताना प्रथम. दीर्घश्वास घेऊन सा म्हणजे षड्ज लावावा. असे करताना आवाजात थोडा कंप आला तरी नेटाने सा लावणे चालू ठेवावे. पंधरा मिनिटांत नंतर तुम्हाला आवाज स्थिर झाल्याची जाणीव होईल त्या नंतर क्रमा क्रमाने वरच्या म्हणजे तार सप्तकाच्या षड्जा पर्यंत जावे.यालाच खर्जातील रियाज असेही म्हटले जाते.
जर गायकाचा खालचा सा,पंचम आणि वरचा सा संवादिनी बरोबर जुळले तर त्याचा रियाज योग्य मार्गावर आहे हे कळून येते. त्यानंतर एखादा राग घेऊन त्याच्या आरोह अवरोहावर काम करावे.अगदी एक एक स्वर लावण्या पासून सुरवात करून त्याच सरगमाचे दोन स्वरांचा, तीन स्वरांचा,चार,स्वरांचा,एकस्वर सोडून असे अलंकार तयार करून स्वर घोटावे उदाहरणार्थ भूप राग गात असाल तर प्रथम
सा रे ग प ध सा नंतर
सा रे सा
सा रे ग रे सा
सा रे ग प ग रे सा
सा रे ग प ध प ग रे सा
नंतर
सरेग,रेगप,गपध,पधसां
नंतर चार स्वरांचा असे अलंकार ताला सहित घोटून रियाज करावा.त्या नंतर सरगम आकारात घोटावा पुढे तानांचा रियाज करताना एखादा स्वर सुटणे,कमी लागणे किंवा दम सास कमी पडणे या गोष्टींचा टाळता येतात.
दुसरे असे काही रागांमधे स्वर सरळ लावत नाहीत मागील स्वराची आस घेऊन लवण्यासाठी स्वर ज्ञान पक्के असावे लागते.आरोह अवरोहाचे अलंकार तयार केल्याने स्वर अचूकतेने लागण्यास मदतच होते.
या नंतर रागाची चीज गावी त्यामुळे शब्दोच्चारण,ताल,आणि ताना यांचा अभ्यास होत राहतो. हा स्वराभ्यास करताना. त्या रागाचे अंग दाखणा-या स्वर पद्धतीचा रियाज खास असावा. रागात गोंधळून जाणे होत नाही. जेणे करून काही सेकंदात गायक कोणता राग गाणार आहे हे कळून येते.
असा केलेला रियाज साधारण दोन तास चालतो.त्यामूळे रोजच्या रोज स्वर घासले जातात.त्याचा प्रकाश गायकाच्या गाण्यातून श्रोत्यां पर्यंत. सहज आणि मधुर पद्धतीने पोहोचतो. अशाप्रकारचा स्वराभ्यास गाण्यातील अचूकता,सुस्वरपणा आणि आलप ताना या संकल्पनानी गाणे समृद्ध करते.गायकालाही आत्मानंदाची अनुभूती देतो.
गायन कला ही गोमुखी विद्या आहे.तिच्या मुखी शिरणे सहज शक्य असते.पण नंतर जर रियाज ठेवला नाही.तर गायक शून्यवत् होतो. अस म्हटले जात एक दिवसाचा रियाज चुकला तर काही हरकत नाही.दोन दिवसाचा रियाज चुकला तर तो फक्त गायकाला कळतो.आणि तीनदिवसांचा रियाज चुकला तर श्रोत्याना कळतो. या वरून कळून येते.सातत्याने सराव,स्वराभ्यासाला रियाजाला गायनाच्या क्षेत्रात अनन्य साधारण महत्त्व आहे
-तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment