स्तोत्र वाङमय
भारतीय वाङमयाचा आत्मा म्हणजे स्तोत्र गायन नित्यपठणा साठी अथवा पूजेच्या वेळी मंत्र म्हणून गुणगुणताना, विशेषतः संध्याकाळच्या वेळी जी म्हणण म्हणायची पद्धत आहे.त्यात आबालवृध्द या वाङमयाशी परिचित असतात.अगदी लहान वया पासून स्तोत्र पठनाची सुरवात भिमरूपी या स्तोत्राने होत असते.पुढे मग गणपती स्तोत्र,नवग्रह स्तोत्र,रामरक्षा,इत्यादी अनेक स्तोत्रांचे आयुष्यात आगमन होते. नित्यपाठ,परवचा आणि म्हणणे या त्रयिने बालपण समृद्ध होत असते.
स्तोत्र हा शब्दच संस्कृत मधील स्तु =स्तवन करणे,प्रार्थना करणे या धातू पासून तयार झाला आहे.स्तोत्रामधे इष्ट किंवा आराध्य देवतेचे स्तुतिपर श्लोक असतात.ती छंदोबद्ध. म्हणजे बहुतेक करून अनुष्टुभ,त्रिष्टुभ अशा अंगभूत लय ताल असलेल्या परिचित छंदात असल्यामुळे गेय असतात.त्यामुळे पाठांतरासाठी सहज सोपी असतात आणि बाल वाणीला उच्चारणाचे वळण देऊन बोबडेपणा पळवून लावणारी ठरतात.
सर्वसाधारणपणे स्तोत्राचे तीन विभाग पडतात
१) आरंभ किंवा मंगलाचरण
यात नेहमीच श्री गणेशाय नमः। या चरणाने सुरवात होते .किंवा ओम् कार उच्चारण करून पठनाला सुरवात होते त्या नंतर सदर स्तोत्र कोणत्या वृत्तात आहे,त्याचा रचयिता ऋषी तसेच त्यात कोणत्या देवतेची स्तुति केली आहे.आणि पठनफलाच्या बंधनासाठी किलकोच्चारण असा मजकूर असतो.
२) देवतेचे ध्यान वर्णन किंवा नामावली
या विभागात ज्या देवतेचे स्तुतीगान असेल तिच्या शारिरीक सौंदर्याचे आणि रूपाचे वर्णन केलेले असते.अर्थात सगुण साकार. मूर्ती बद्धरुपाचे प्रत्ययकारी वर्णन असते
३) स्तवन किंवा गुणगान
या विभागांतर्गत कवी वेगवेगळ्या श्लोकांच्या माध्यमातून इष्ट देवतेची स्तुती करतो.थोडक्यात वेळप्रसंगी कविला त्याच्या इष्टदेवतेचा कसा प्रत्यय येतो किंबहुना कवीची त्या देवतेचे कडे पाहण्याची दृष्टी येथे सुस्पष्ट स्वरूपात दिसून येते
४) फलश्रुती
विभाग स्तोत्र समाप्तीची सूचना असते.फलश्रुती मधे पाठकाला देवतेने काय द्यावे म्हणजेच पाठकाच्या देवतेकडून काय अपेक्षा आहेत .हे स्पष्ट पणे नमूद केलेले असते.
अशी ही सुलभ,सुरस स्तोत्रे चारप्रकारची असतात.
१) नाम स्तोत्रे
या प्रकारात सहस्त्रनामावली,अष्टक,दशक अशाप्रकारची स्तोत्रे अंतर्भूत असतात.यात देवतेची विविध नामे छंदोबद्ध केलेली असतात. हा नामजपाचा प्रकार असून देवाचे नाम मनात इच्छा ठेऊन घेणे.ज्यायोगे देवाने पाठकाची इच्छापूर्ती करावी
२) दुःख निवारक. किंवा मोचक स्तोत्रे
यात भक्तीभाव प्रधान असल्याने देवाने आपले दुःख दूर करावे अशी आळवणी असते
३) कामनापूर्ती स्तोत्रे
याप्रकारच्यास्तोत्रातून देवतेने पाठकाला आपत्यप्राप्ती,धनधान्य ,विद्या प्राप्ती करण्यात सहाय्य करावे म्हणून देवाची आळवणी करतात. अशा प्रकारचे पठन हे काम्य म्हणजे मनात इच्छा धरून केले जाते. इच्छापूर्ती झाल्यावर देवतेची पूजा करून नैवेद्य समर्पित करून कृपादृष्टी ठेवण्याची विनंती करतात.
४) रक्षा स्तोत्रे किंवा कवच
यात देवतेने आपल्या बरोबर जगद्र्क्षण करावे सर्वांचे कल्याण करावे अशा प्रकारची प्रार्थना केलेली असते.
स्तोत्र वाङमयाचा समाज जीवनात अंतर्भाव. म्हणजे "कलौ तद् हरिकीर्तनात्" या उक्तीचा प्रत्यय असतो.उच्चारण शुद्धता येणे,स्वरयंत्रची नित्य शुद्धता आणि स्मरण दोषांचे निवारण हे स्तोत्र पठनाचे व्यावहारिक उपयोग आहेत.
स्तोत्रे म्हणजेच सूक्ताचे सुलभ,सर्वग्राही रुप असते.त्याची भाषा ओघवती आणि प्रवाही असते.गेयता हा त्याचा प्रमुख गुण असल्याने ती सर्वतोमुखी सहजपणाने होतात. तसेच ती उच्चसूरात गायली जात असल्यामुळे वातावरण भारून टाकण्याची शक्ती या वाङमय प्रकारात आहे.
हे वाङमय प्रादेशिक भाषांमध्ये ही विपुल प्रमाणात आढळते.
- तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
No comments:
Post a Comment