Thursday, August 16, 2018

सर्जनशीलता आणि उत्स्फूर्तता

सर्जनशीलता आणि उत्स्फूर्तता.

आपण एखाद्या कलाकार व्यक्तीबद्दल बोलताना सराईत पणे दोन शब्दांचा वापर करतो. होय तो कलाकार सर्जनशील आहे,त्याचा प्रतिसाद उत्स्फूर्त असतो.

काय आहेत हे दोन शब्द जे कलाकाराच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून जातात. त्या कलाकृतीच्या लोकप्रियतेत एक मोठे काम करून तिला एका उंचीवर नेऊन ठेवतात. त्यातला सर्जनशील या शब्दाला creative असे इंग्रजीत म्हणतात. या ठीकाणी सृजन आणि सर्जन या  शब्दांच्या अर्थात. माणसे नेहमीच गल्लत करतात.कारण या दोन शब्दातील. अर्थफरकाच्या तरल रेषेकडे त्यांचे लक्षच नसते.

सृजन या शब्दाचा अर्थ उत्पत्ती तर सर्जन या शब्दाचा अर्थ निर्मिती.

उत्पत्तिचा संबंध नेहमीच निसर्गाशी जोडलेला आहे. तर सर्जन हा मानवाचा गुण मानतात..या अर्थामध्ये गल्लत झाल्या कारणाने त्याचे संदर्भ बदलतात. कलाकाराच्या किंवा माणसाच्या संदर्भात सर्जन हा शब्द जास्त चपखल ठरतो.

सर्जनात कायम नावीन्याचा ध्यास असतो.कारण सर्जन हा गुण माणसातील प्रतिभा शक्तीशी जोडला गेला आहे.  माणसाच्या डोक्यात अनेक कल्पना असतात.त्यांना त्या कल्पनेला विषयी जिव्हाळाही असतो.पण "how to project them." या वाक्याशी गाडी अडण म्हणजेच प्रतिभा शक्तीचा अभाव.जेव्हा," मला माहित आहे,माझ्या कल्पना कशा राबवायच्या"अशा वाक्यातून माणसाच्या सर्जनशीलतेची झलक दिसते.

थोडक्यात काय तर सर्जन हा माणसाचा गुण असला तरी त्याचे स्वामित्व बुद्धी कडे असते. त्यामुळे बुद्धि "सु" अथवा "कु"यापैकी कोणत्या उपसर्गाच्या संपर्कात येते त्यावर त्या कल्पनेचा विस्तार,आकार,आणि मांडणी हे अवलंबून असते. जेवढा विचार जास्त तेवढा सर्जनाचा आवाका मोठा. "निरीक्षण" हा गुण सर्जनाचा आधारस्तंभ असतो.जेवढे निरीक्षण कराल तितकी सर्जनशक्ती बलशाली होत जाते. ह्याचा वापर नेहमीच नाटक,चित्रपटातील कलाकार. करीत असतात.एखाद्या व्यक्तीचीखाद्या व्यक्तीची आवडलेल लकब,बोलण्याची पद्धत,उठणे,बसणे,चालणे यांच्या ढबींचाउपयोग योग्य आणि सयुक्तिक पणे करतात तेव्हा ती व्यक्तिरेखा रसिक आणि सामान्य या दोनही प्रकारच्या व्यक्तीना आवडते किंबहुना ती त्यांना आवडते म्हणून ती चिरकाल स्मरणात राहते.यालाच सर्जन असे म्हणतात

म्हणून "सर्जन" हा अंगभूत गुण आहे.तो निरीक्षणाच्या मदतीने फळतो फुलतो.

तर उत्स्फूर्तता (spontaneity) ह्या बद्दल विचार करायचा तर हा ही गुणच पण हा गुण ना अनुवंशिक असतो नाही अंगभूत ना जन्मजात हा गुण म्हणजे तुमच्या भाषाशक्ती,निरीक्षण शक्ती,आणि आकलन शक्तिचा परिपाक असतो. म्हणूनच या गुणाचे वर्गीकरण करताना "अभ्यासपरिपाक" गुण असे करावे लागेल.यात सहजता प्राप्त करण्यासाठी माणसाची परिपक्व बुद्धी कारणीभूत असते.उत्स्फूर्तता ही नेहमी प्रतिक्रीया किंवा प्रतिसाद अशा स्वरूपात येत असतो.

यासाठी निरीक्षणा बरोबर परिस्थितीचा विचार करावा लागतो. जडजंबाल चर्चा संपत असताना  अचानक हलकी फुलकी टिप्पणी ऐकली तर चर्चेचा सगळा शीण दूर होतो. हे सहज साध्य नाही वाचन,निरीक्षण,आकलन आणि परिस्थिती या सगळ्याचा परिपाक असतो.

हे दोनही गुण एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या सारखे पाठीला पाठ लावून येतात आणि माणसाच्या आयुष्य समृद्ध करून जातात.

- तृप्ती लोणकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment