नांदी
संगीत नाटक म्हटले की त्याची सुरवात नांदी ने होणार हा प्रघात आहे.रंगमंचाची झालेली पूजा, धूपाचा दरवळणारा मंद सुगंध आणि वर जाणाऱ्या पडद्यामागे सूत्रधार,नटी आणि समस्त नटगण वर्ग हात जोडून उभा असतो आणि ऑर्गनचे सूर तबल्याचा ठेका वाजायला सुरुवात नटेश्वराच्या,गणपतीच्या किंवा नाटककाराच्या आराध्य देवतेच्या स्तुती गायनाने होते.
हे गीत म्हणजेच नांदी या शब्दाची व्याख्या करताना-
नन्दन्ति देवतां अस्यां सा म्हणजे जी देवदेवतांना आणि रसिकदेवतेला आनंदीत करते ती नांदी!
नांदी ही संस्कृत नाटकाचा अविभाज्य भाग आहे.मराठी संगीत रंगभूमी वर जशीच्या तशी उचलली गेली.आणि ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक ठरली.
नांदी या गीत प्रकाराच्या रचनेत ईशवंदना, स्तुती, नाट्याभिनयाची थोडी तयारी, संगीताने प्रेक्षकांचे मनोरंजन आणि प्रयोगाला पोषक अशी वातावरणनिर्मिती, नाटककार आणि नाटक यांची प्रस्तावनारूप ओळख, प्रेक्षकांची आराधना असे पूर्वरंगाचे विविध उद्देश आहेत. त्यात नांदीचे कार्य ईशस्तवन, मंगलाचरण, संरक्षण-कुशलासाठी प्रार्थना हे आहे.
व्याख्येप्रमाणे नांदीत देव, द्विज,(विद्वान कवी) नृप(राजा) इत्यादींची स्तुती आणि आशीर्वचन (आशीर्वाद)असते. नांदी ‘नित्य’ म्हणजे(बदल न होणारी) प्रत्येक प्रयोगारंभी म्हणावयाची असून तिचे स्वरूपही ‘नित्य’(सूर,राग,आलापाचा बदल न होणारा) म्हणजे ठरलेले असते, तसेच तो सूत्रधाराचा ‘पाठ’(म्हणायचे गाणे) असून पूर्वपरंपरेने आलेला किंवा गुरूपासून घेतलेला अथवा स्वतः रचलेला असतो. ‘परिवर्त’ या नांदीच्या आधी असलेल्या भागात सूत्रधार दोन पारिपार्श्विकांसह रंगमंचावर येऊन दिग्देवतावंदन, परिवर्तनी ध्रुवागानाच्या तालात व लयीत करतो.
नांदीचे गायन मध्य लयीत. आणि मध्यम स्वराला सा(षडज्) समजून करण्यात येते. ज्या योगे समूह एकत्रितपणे गीत गायन करतो.तर मुख्य गायकाच्या(आवाज तपवण्याचा व्यायाम असतो) आवाजाचा पोत पाहून पुढील पदांसाठी त्याचा स्वर सहज लागतो.
नांदी मधे ईशस्तवन असते.रंगकर्मीं साठी नटेश्वर म्हणजे शिवशंकर ही आराध्य देवता असते.म्हणून ईशानाचे पर्यायाने नटेश्वर रुपात शिवाचे स्तवन असते.
पण परंपरे प्रमाणे गणेश वंदन ही असते यासाठी संगीत शाकुंतलाची नांदी विचारात घेता
पंचतुंड नररुंड मालधर
पार्वतीश आधी नमितो
पाच तोंडांचा आणि ज्याने नररुंडांची म्हणजे कवट्यांची माला धारण केली आहे अशा शिव शंकराला प्रथम नमन करतो.
विघ्नवर्ग नग भग्न कराया
विघ्नेश्वर गणSपती मग तो
त्यानंतर नाट्यप्रयोगात येणाऱ्या अनेक विघ्नांचा पर्वत (असंख्य अडचणींचा डोंगर)दूर करावा म्हणून शिवा नंतर विघ्नहर्ता गजाननाची प्रार्थना करतो.
त्या नंतर अण्णासाहेब किर्लोस्कर नाटकाची पार्श्वभूमी सांगतात. कारण कालिदासाच्या प्रतिभाशक्ती पुढे आपण सामान्य असल्याची ग्वाही देत असता ते म्हणतात-
कालिदास कविराज रचित हे
गाने शाकुंतल रचितो
कालिदासाच्या काव्यकृतीचा मराठीत तो सुद्धा गाने म्हणजे काव्यात्मक रुपांतर करीत असल्याचे प्रेक्षकांना विदीत करतात पुढे ते म्हणतात-
जाणूनिया अवसान नसोनी
हे महत्कृत्यभर शिरी घेतो
अण्णासाहेब स्वतःच म्हणतात मी जाणतो कविराज कालिदासाच्या पासंगाला मी नाही. कालिदासाचे अफाट आणि प्रचंड, महान असे कार्य माझ्या आवाक्यात बाहेरचे काम असले तरी माझ्या सारख्या कडून हे काम होत असताना मी जणू डोक्यावर न पेलणारा भार घेतला होता.तरीही त्या महान अशा भाराने झालेले एक महान् कार्य आहे.पुढे ते म्हणतात-
ईशवराचा लेश मिळे जरी
मूढ यत्न शेवटी जातो
माझ्यासारख्या मूढमतीवर जर ईश्वराची लेशमात्र थोडीशी जरी कृपा झाली असेल तर हा गगनाला गवसणी घालण्याचा केलेला मूढ(बालिश) प्रयत्न देखील सफल होतो. म्हणून मी हे धाडस केले आहे पुढे ते सांगतात-
या न्याये बलवत्कवि निज हे
वाक्पुष्पी रसिकार्चन करीतो
मी केलेल्या मूढ यत्नाचे ईश्वर कृपेने सोने होईल या न्यायाने.म्हणजे अशी परंपरा असल्यामुळे बलवंत नाटक मंडळीतील हा कवी स्वतःच्या कवन पुष्पांनी रसिक प्रेक्षकांचे पूजन करीत आहे.
ईश स्तवनापासून सुरू झालेली ही नांदी मायबाप रसिकांच्या पूजनापर्यंत येऊन भिडते.यातून अण्णासाहेब स्वतः आपण केलेला प्रयत्न म्हणजे कालिदासाच्या काव्यकृती पुढे अत्यंत साधा असल्याची ग्वाही देतात.तर रसिकांना विनंतीही करतात हा माझा मूढ प्रयत्न म्हणजे मी माझ्या पदांनी देवाची आणि रसिकांची केलेली पूजा आहे.
थोडक्यात काय तर मी तुमच्या पूजेचा विधी जाणत नाही तेव्हा हे माझे बोल गोड मानून घ्यावे ही कळकळीची विनंती करतात.
अण्णासाहेब स्वतः गायनाचे जाणकार असल्याने त्यांनी ही नांदी खमाज रागात बांधली तर ताल म्हणून धुमाळी उपयोग केला.
नांदी गायनाचे साठी चतस्र तालाची म्हणजे ,८,१२,१६ अशा चार चार मात्रांच्या विभागणीचे ताल उपयोगात आणावे या नियमाला अनुसरून धुमाळीचा उपयोग केला आहे.कारण धुमाळी वाजवताना वातावरण भारून टाकण्याची ताकद त्या तालाची शक्ती आहे.
अशा प्रकारे शास्त्रशुद्ध आणि दिलखेचक रचना संगीत शाकुंतलाच्या आरंभी रसिक वर्ग ऐकत असतो. त्यामुळे पुढील. परिचित नाट्यकथे ऐवजी पदांची उत्सुकता मनात जागृत होते.
ही नांदी नित्य आहे संगीत शाकुंतल हे नाटक १८८० साली रंगमंचावर आले आजतागायत नांदीतील आलापही कोणी बदलत नाहीत. अशा प्रकारची अवीट मोहिनी त्या सुरांत आणि शब्दांत साठून आहे.
-तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:
Post a Comment