Tuesday, October 30, 2018

दिवाळी कंदिल वर्कशाॅप

दिवाळी कंदिल वर्कशाॅप

 दिवाळी मधे कंदिल ही वस्तू अत्यंत आवश्यक वस्तू या सदरात मोडते ज्या प्रमाणे जीवनावश्यक गोष्टी असतात त्या प्रमाणे दिवाळी आवश्यक वस्तू म्हणजे कंदिल. माणसाच्या सौंदर्यासक्तीचे द्योतक असतो.

                 दिवाळीतील कंदिल म्हणजे यमदीप दरवाजावर लटकवलेला कंदिल म्हणजे दुःखाला दिलेला इशारा असतो आमच्या आनंदात विरजण घालायला येऊ नको. इथूनच परत जा.

         कंदिलांचे कितीतरी प्रकार असतात पायलीचा(फिरणारा) कंदील,चांदणीचा कंदिल,(नेहमीचा)षट्कोनी आकाराचा कंदिल, करंजीचा कंदिल इत्यादी अनेक प्रकारचे आणि करणाराची कल्पनाशक्ती जितकी धावेल तसे वेगळे कंदिल.

             साधारणतः वसुबारसेच्या आधी कंदिल लावला जावा अशी प्रथा होती. आम्ही दरवर्षी कागदाचा म्हणजे आताच्या भाषेत इकोफ्रेंडली कंदिल करत असू  

           कंदिल करण ही एक कला आहे.अगदी बांबूच्या काड्या तासण्यापासून ते शेपट्या(झिरमिळ्या)चिकटवण्यासाठी पर्यंत जर छान भट्टी जमली तर कंदिल देखणा होतो.अस आमचे आजोबा सांगत

       देखणा कंदिल करण कोणी जन्मतःच शिकून येत नाही किंवा त्या वेळी कंदिल मेकींग वर्कशाॅप्सही नसायची पण आम्हाला या गोष्टीच शस्त्रशुद्ध. प्रशिक्षण मिळायच. प्रशिक्षण शिबिराची वेळ असे रात्री आठ नंतर ते कंदिल पूर्ण होई पर्यंत. आणि प्रशिक्षक असत आजोबा,वडील,काका,मामा,आणि वाडीतील प्रशिक्षित दादा लोक.

          प्रशिक्षणाची सुरवात बांबूच्याकाड्या तयार करण्यापासून व्हायची  आम्ही काड्या करायला तयारी दाखवली की कोणीतरी  गतवर्षीय प्रशिक्षित दादा  कुचकटपणाने विचारायचा सुरीने लिंबू चिरता येत का? ते शिकून ये मग काड्या तास असो अशी सुरवात. व्हायची एका मापाच्या बत्तीस काड्या आणि चार मोठ्या काड्या अशा छत्तीस काड्या कापून झाल्यावर त्या काड्यांवर फार मोठे संस्कार करण्याची जबाबदारी दिली जायची ती म्हणजे पाॅलीश पेपरनी काड्या गुळगुळीत करणे.आम्हाला सांगितल जायचं जेवढ्या काड्या गुळगुळीत होतील तेवढा त्याच्यावर कागद चिकटवण्यासाठी सोप असत.मग आम्ही मनलाऊन अभ्यास करत नसू पण काड्या तासण्यात कसूर नसे.

            या पायरी नंतर सुप्रशिक्षित म्हणजे काका,मामा या चमूचे आगमन होई. कंदिलाच्या आकारा प्रमाणे त्रिकोण चौकोन बांधले जात. आणि कंदिलाचा सांगाडा तयार केला जाई.त्यानंतर आई कडून खळ म्हणजे पोळ्या करण्याच्या कणकेत पाणी घालून  शिजवून केलेली घरगुती पेस्ट आणण्यासाठी आम्हा मुलींची रवानगी होत असे.

          नंतर उपस्थित असलेल्यांचे तीन गटात विभाजन होई एका गटाने कागद मापानुसार कापायचे दुस-या गटाने त्या कागदांच्या कडेला खळ लावायची आणि तिस-या अनुभवी आणि सुप्रशिक्षित गटाने तो कागद न फाडता सांगाड्यावर ताठ,सुरकुत्या न पाडता चिकटवायचा.

         यावेळी कागद कापणे कत्रीने कापणे म्हणजे अकुशलपणाच लक्षण मानले जात असे.त्यासाठी पतंगाच्या मांजाचा उपयोग केला जात असे. 

           मापानुसार कागदाची लांबीत घडी केली जाई आणि त्यात तेवढ्याच लांबीचा मांजा सरकवून. एकाने दुस-या टोका कडून तर्जनीचा दाब देऊन घट्ट दाबून धरायचे आणि दुस-याने मांजा बाहेर खेचायचा अशा त-हेने पट्ट्या,चौकोन,त्रिकोण कापायचे व ते सांगाड्यावर चिकटवले जायचे.मग कात्रीने सोनेरी बेगडाच्या कगदाची बाॅर्डर करून ओव्हरलॅपींग झालेले कागद लपवले जायचे.मग असा तयार झालेला कच्चा कंदिल. तात्पुरता दोरी बांधून वर  लटकवला जायचा त्या नंतर त्याला शेपट्या लावायच्या  खालच्या  आणि वरच्या बाॅर्डला करंज्या व प्रत्येक कोप-यात. कागदी फुले लावायची

          सगळ्यात शेवटी चित्रकलेच्या वहितला कोरा कागद घेऊन त्याची नक्षी कापून कंदिलाच्या चौकोनावर मधोमध चिकटवायची. असा कंदिल देखणा करायचा. मग तो दाराबाहेर लटकवला जायचा.

           दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला हा देखणा कंदिल दिमाखात लटकत असायचा.ज्याच्या दारात कंदिल नाही त्याच्याकडे काहीतरी दुःखद घडले आहे हे समजायचे.

        माझ दुःख येवढच असायची इतका देखणा कंदिल जीवापाड मेहनत करूनही मला नेहमी तिसरा नंबर मिळायचा.वाडीतला नंदूकाका  हमाम साबण,टेलिव्हिजनसेट,अशा वेगवेगळ्या आकाराचे कंदिल करायचा तर हरकुँवर बाईच्या चाळीतील जोश्यांचा पायलीचा कंदिल असायचा.त्यामुळे थोड वाईट वाटायचं पण दिवाळीच्या नादात ते सगळ विरून जायच 

       पुढच्या वर्षी नक्की सगळ्यांपेक्षा देखणा कंदिल करायचा असा निश्चय करून पुढच्या वर्कशाॅपची तयारी सुरू व्हायची. पुढील वर्षी वरच्या फळीत प्रवेश मिळायचा आणि स्वतंत्रपणे  कंदिल कधी करायला लागले  हे कळल देखील नाही.

कंदिलाचा सांगाडा




         आता मात्र मी चायनीज कंदिल विकत आणते आणि देखण्या कंदिलाच्या समाधान मानते

- तृप्ती लोणकर

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment